सोसायटीच्या रस्त्यावर शतपावली करत असताना एका महिलेचे दागिने हिसकावून चोरटे पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील (Pune) वडगावशेरी (Wadgaon Sheri) येथे ही घटना गुरुवारी (18 फेब्रुवारी) घडली आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी दोन अज्ञात व्यक्तिविरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत असून अधिक तपास सुरू आहे. पुण्यात सोनसाखळी चोरी होण्याचे प्रकार वाढल्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
वडगावशेरी येथील बॉम्बे सॅपर्स कॉलनीजवळच्या सनराइज सोसायटीसमोरील रस्त्यावर हा प्रकार घडला आहे. संबंधित महिला गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आपल्या जावेसोबत शतपावली करत होती. त्यावेळी दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून आले आणि त्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळून गेले. त्यानंतर महिलेने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. परंतु, लोक जमायच्या आत ते पसार झाले. यानंतर संबंधित महिलेने घडलेला सर्व प्रकार चंदननगर पोलीस ठाण्यात जाऊन सांगितला. महिलेच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र टाईम्सने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- Mumbai: गँगस्टर रवि पुजारी याला 9 मार्च पर्यंत पोलीस कोठडी, मुंबईत 49 पेक्षा अधिक गुन्हे दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेचे हिसकावून नेलेले सोन्याचे मंगळसूत्र 48 हजार रुपयांचे आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. पुण्यात सोनसाखळी चोरीच्या प्रकारात वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.