Mumbai Shocker: मुंबईतील गोरेगाव येथे चालत्या ट्रेनमध्ये 26 वर्षीय महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. पीडित महिलेने दादर येथील रेल्वे पोलीस ठाण्यात या घटनेची एफआयआर दाखल केली होती. जी नंतर कर्जत जीआरपीकडे वर्ग करण्यात आली. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कर्जत जीआरपीचे वरिष्ठ निरीक्षक संभाजी यादव यांनी सांगितले की, पीडित तरुणी पुण्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये प्रवास करत होती. त्यांनी सांगितले की, पीडित मुलगी अंधेरीहून ठाण्याला जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढली होती.
प्रवासादरम्यान तिच्या शेजारी बसलेल्या 40 वर्षीय व्यक्तीने तिच्या कंबरेला स्पर्श केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. महिलेने पहिल्यांदा त्याकडे दुर्लक्ष केले त्यानंतर ती दरवाजाजवळ गेली. काही वेळाने आरोपीही दरवाजाजवळ आला. तेथे त्याने पुन्हा महिलेला हात लावला. इन्स्पेक्टर यादव म्हणाले की, आरोपीच्या या कृत्यावर महिला गप्प बसली आणि तिने ठरवले की, ती त्या पुरुषासोबत स्टेशनवर उतरेल हा सर्व प्रकार रेल्वे पोलिसांना कळवेल. (हेही वाचा - Madhya Pradesh Dalit Rape Case: अल्पवयीन दलित बलात्कार पीडितेला पोलीस ठाण्यात बेल्ट आणि लाथांनी बेदम मारहाण; तीन पोलिस अधिकारी निलंबित)
महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली. महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपी बोरिवलीहून ट्रेनमध्ये चढला होता. त्या आधारे पोलिसांनी त्या लाइनशी संबंधित फुटेज पाहण्यास सुरुवात केली. फुटेजच्या आधारे संशयित आरोपी पश्चिम रेल्वे मार्गावरील गोरेगाव स्थानकावर उतरताना दिसला. नंतर रेल्वे पोलिसांनी बांगूर नगर पोलिसांच्या मदतीने आरोपीचा माग काढला आणि त्याला 6 सप्टेंबर रोजी भगतसिंग नगर येथील त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली.
ट्रेन कर्जतला पोहोचली तेव्हा ही घटना घडल्याने प्रकरण कर्जत जीआरपीकडे वर्ग करण्यात आले. मात्र, ट्रेनमध्ये गर्दी असल्याने त्याने पीडित महिलेला चुकून स्पर्श केला असावा, असा दावा आरोपीने केला आहे.