दादर रेल्वे स्टेशनमध्ये महिलेची फलाटावरच प्रसूती
DADAR | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

रेल्वेची वाट पाहात थांबलेल्या एका महिलेची दादर रेल्वे स्टेशनवर (Dadar Railway Station)अचानक प्रसुती झाली. गीता दीपक वागारे (Geeta Deepak Wagare) (वय 21 वर्षे) असे या महिलेचे नाव आहे. गीता आणि तिचे पती दीपक हे दोघे पुण्याला निघाले होते. त्यासाठी ते दादर रेल्वे स्टेशनवर आले होते. दरम्यान, गीताला प्रसूती वेदना सुरु झाल्या. तिने एका बाळाला जन्म दिला.

अचानक प्रसुती वेदना सुरु झाल्याने हे जोडपं सुरुवातीला गोंधळून गेले. फलाटावरील प्रवासी आणि रेल्वे पोलीसांनी गीता हिला रुग्णालयात न्यायचा प्रयत्न केला. तोपर्यंत गीताची फलाटावरच प्रसूती झाली. त्यानंतर आई आणि नवजात अर्भकाला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे फलाटावर काही काळ आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. रेल्वे ही मुंबई शहरात प्रवास करण्यासाठी एकमेव गतीमान यंत्रणा आहे. त्यामुले गर्भवती महिला असो किंवा रुग्ण, ज्येष्ठ नागरिक. सर्वांनाच या यंत्रणेचा वापर करावा लागतो. त्यामुळे लोकल प्रवासात प्रसुती झाल्याच्या अनेक घटना यापूर्वीही घडल्या आहेत. (हेही वाचा, पश्चिम रेल्वे: महिला प्रवाशांना ख्रिसमस गिफ्ट, दोन नव्या ‘लेडीज स्पेशल' लोकल-ट्रेन सेवेत दाखल)

गेल्यावर्षीही सलमा शेख नावाच्या एका महिलेची दादर रेल्वे स्थानकावरच्या फलाट क्रमांक तीनवर प्रसुती झाली होती. तिने एका मुलीला जन्म दिला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून सलमा प्रवास करत होती. ती लोकल दादर स्टेशनच्या फलाट तीनवर उभी होती. दरम्यान, सलमाला प्रसूती वेदना सुरु झाल्या. तिला पुढील उपचारासाठी नेत असताना फलाटावरच तिने गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर तिला जवळच्या केईएम रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.