पश्चिम रेल्वे: महिला प्रवाशांना ख्रिसमस गिफ्ट, दोन नव्या ‘लेडीज स्पेशल' लोकल-ट्रेन सेवेत दाखल
पश्चिम रेल्वे मार्गावर दोन नव्या ‘लेडीज स्पेशल' लोकल-ट्रेन सेवेत दाखल | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Christmas gift from Western Railway: मुंबईतील गर्दी आणि त्याचा रेल्वे वाहतुकीवर पडणारा ताण विचारात घेऊन रेल्वे प्रशासन विशेष प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांचाच भाग म्हणून पश्चिम रेल्वेने महिलांना खास ख्रिसमस गिफ्ट (Christmas Gift) दिले. पश्चिम रेल्वे (Western Railway) मर्गावर आणखी दोन नव्या लेडीज स्पेशल लोकल ट्रेन (Ladies Specials Train) सुरु करण्यात आल्या. तसेच, ख्रिसमसपासून या लोकल सेवेत दाखलही झाल्या.  मंगळवारी (25 डिसेंबर) नव्या लोकलची पहिली फेरी सकाळी ९ वाजून ०६ मिनिटांनी भाईंदरवरुन सुटली आणि सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी चर्चगेट स्थानकावर पोहोचली. तर, दुसरी नवीन लोकल फेरी सकाळी १० वाजून ०४ मिनिटांची वसई रोड स्थानकावरून सुटली. ती सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी चर्चगेटला पोहोचली. नव्याने सेवेत दाखल झालेल्या दोन लोकलमुळे या मार्गावरुन धावणाऱ्या लेडीज स्पेशल ट्रेनची संख्या आता 10 वर पोहोचली आहे.

सरकारी, खासगी संस्थांमध्ये नोकरी करणाऱ्या तसेच, व्यवसायासाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांना या लेडीज स्पेशल लोकलचा फायदा होईल. तसेच, विद्यार्थिनी, युवती आणि विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या तरुणींनाही या लोकलचा फायदा होईल. अस पश्चिम रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने या लोकल सुरु करण्याचा निर्णय घेतला असला तरी, सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत मात्र श्रेयवादाची लढाई सुरु करण्यात आली आहे. लेडीज स्पेशल सुरु करण्याचे श्रेय नेमके कुणाचे याच्याशी आपला काहीही संबंध नाही. आम्हाला सेवा मिळाली यात आनंद आहे, असे प्रवाशी सांगतात. (हेही वाचा, मध्य रेल्वे प्रवाशांना देणार नववर्षाची भेट; 66 नव्या सेवा तर, 49 सेवांचा विस्तार!)

दरम्यान, लेडीज स्पेशलमुळे प्रवास करताना अधिक गतीमानता येईल. तसेच, वेळ वाचेल. प्रामख्याने सर्वसाधारण ट्रेनमध्ये असलेली गर्दी, त्या तुलनेत महिलांसाठी असलेल्या डब्यांची कमी संख्या त्यामुळे प्रवास करताना खूप वेळ जायचा. तसेच, अनेकदा अपघातासारखे प्रसंगही यायचे. नव्या लोकलने हा त्रास कमी होण्यास मदत होईल अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली आहे.