Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाने (Coronavirus) पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. राज्यात झपाट्याने वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यातील विविध शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याचपार्श्वभूमीवर सर्वांना आणखी चिंतेत टाकणारी एक माहिती समोर आली आहे. राज्यात गेल्या आठ दिवसात जवळपास एक लाख कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अशाचप्रकारे वाढत गेली तर, राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन (Lockdown) लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सोमवारी (8 मार्च) 8 हजार 144, मंगळवारी (9 मार्च) 9 हजार 927, बुधवारी (10 मार्च) 13 हजार 659, गुरुवारी (11 मार्च) 14 हजार 317, शुक्रवारी (12 मार्च) 15 हजार 817, शनिवारी (13 मार्च) 15 हजार 602, रविवारी (14 मार्च) 16 हजार 620 अशी एकूण 8 दिवसात 94 हजार 86 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ झाल्याचे दिसत आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अशीच वाढ होत गेली तर, लॉकडाऊन लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे देखील वाचा- Coronavirus In Aurangabad: महाराष्ट्राची लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल; मुंबई, पुणे, नागपूरसह औरंगाबाद येथीलही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ
महाराष्ट्रात कोरोना अटोक्यात येत असताना अचानक रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात आहेत. तसेच कोरोनावर 100 टक्के गुणकारी ठरेल, अशी लस अद्याप आली नसून नागरिकांनी तोंडावर मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आणि वारंवार हात स्वच्छ धुवावेत, असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. दरम्यान, कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविरोधातही कडक कारवाई केली जात आहे.
राज्यात आज 8 हजार 861 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 21लाख 34 हजार 72 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1 लाख 26 हजार 231 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.21% झाले आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.