Chandrakant Patil, Raj Thackeray, Bala Nandgaonkar (Photo credit: Facebook)

महाराष्ट्रातील (Maharashtra) आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्ष आतापासूनच तयारीला लागले आहेत. तसेच पक्ष बळकट करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरु केले आहेत. यातच भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज (6 ऑगस्ट) मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट कृष्णकुंज येथे भेट घेतली आहे. चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर भाजप- मनसे एकत्र येणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे. या भेटीबाबत मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच मनसे आणि भाजप भविष्यात एकत्र येत असतील तर आनंदच होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

बाळा नांदगावकर यांनी नुकताच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटीवर भाष्य केले. त्यांनी असे म्हटले आहे की, राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. तर, अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. मनसेची मुंबईतही मोर्चेबांधणी सुरू आहे. सर्वच पक्ष आपापल्या पक्षासाठी काम करीत आहेत. मात्र. भाजप आणि मनसे हे दोन पक्ष जर भविष्यात एकत्र येत असतील तर त्याचा आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. चंद्रकांत पाटील जेव्हा आले आणि गेले तेव्हा ते आनंदात होते. सर्वकाही सकारात्मक होते. कारण, आम्ही नकारत्मक विचार करीत नाही. आम्ही एकटे लढत होतो, तेव्हाही सकारात्मक होतो आणि आताही सकारात्मक आहोत, असेही बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- BJP-MNS Alliance: मनसे-भाजप युतीवर आज चर्चा नाही, सहज भेटायला आलो होतो- चंद्रकांत पाटील

दरम्यान, भाजप-मनसे युतीची शक्यता नाही. कारण, मनसेची परप्रांतीयांबाबतची भूमिका आम्हाला मान्य नाही. भाजप-मनसे यांच्यात मतभेद असतानाही ऐकमेकांना भेटणे गरजेचे आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी भेटीपूर्वी म्हटले होते. मनसेने परप्रांतीयांना विरोधाची भूमिका बाजूला ठेवली, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती होण्याचे शक्यता दिसत आहे.