महाराष्ट्र राज्याचं राजकारण हे 'पवार' कुटुंबाशिवाय अपूर्ण आहे असं अनेकदा म्हटलं जातं. दरम्यान शरद पवारांची लेक सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची राजकारणात एंट्री झाल्यापासूनच त्यांच्या रूपाने राज्याला पाहिली माहिला मुख्यमंत्री मिळणार का? अशी चर्चा अनेकदा रंगली आहे. आज लोकमतला दिलेल्या एका विशेष मुलाखतीमध्ये शरद पवारांनी (Sharad Pawar) या विषयावर उत्तर देताना सुप्रिया सुळे यांना राज्याच्या राजकारणापेक्षा राष्ट्रीय पातळीवरील राजकारणामध्ये अधिक रस आहे असं सांगत तूर्तास सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री (Maharashtra CM) होण्याच्या आशा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे. Supriya Sule: 'ठाकरे सरकार पडणार' असे बोलणाऱ्या नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फटकारले.
दरम्यान महाराष्ट्रात नेतृत्त्व देण्याची वेळ आल्यास धनंजय मुंडे, जयंत पाटील, अजित पवार यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. पण सुप्रिया सुळेंना राज्याच्या राजकारणात रस नसल्याचं स्पष्ट केले आहे. प्रत्येकाच्या आवडीचा देखील भाग असतो. तसा सुप्रियाला तो राष्ट्रीय राजकारणामध्ये असल्याचं पवार म्हणाले.
काही दिवसांपूर्वी पत्रकार विजय चोरमारे यांच्या ‘कर्तृत्ववान मराठा स्त्रिया’ या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रात शरद पवार यांच्या हस्ते पार पडलं होते. त्या कार्यक्रमामध्ये भाजपा नेते आशिष शेलार यांनी 'कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, 'असे वक्तव्य केले होते. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली होती. यामध्ये सुप्रिया सुळेंचं नाव आघाडीवर होतं. पण शेलाराचं ते वक्तव्य हे पुस्तकाच्या अनुषंगाने होतं असेही शरद पवार म्हणाले आहेत.