महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपशी युती तोडल्यानंतर शिवसेना पक्षाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत एकत्र येऊन राज्यात महाविकास आघाडी सरकारची (Maha Vikas Aghadi) स्थापना केली आहे. महाविकास आघाडीला राज्यात सत्ता स्थापन करून 1 वर्ष पूर्ण होत आले आहे. दरम्यान, हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, अशा वक्तव्यांना पूर्णविराम लागला आहे, असे वाटत असताना पुन्हा विरोधकांनी राज्य सरकारच्या नेतृत्वावर टीका करण्यात सुरूवात केली आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे. जी भांडी मोकळी असतात ती खूप आवाज करतात. मात्र, भरलेले भांडे कधी आवाज करत नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे
सुप्रिया सुळे या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीचा प्रचार करण्यासाठी इंदापूरात आल्या होत्या. दरम्यान, त्यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्त्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की, "लोक सारखे म्हणतात की, हे सरकार पडणार. हे ऐकताना मला गमंत वाटते. मोकळी भांडी फार वाजतात. त्यामुळे भांड्यांनी करायचा तितका आवाज करा. सरकार पडले तर बघू काय करायच ते…हे सरकार स्थिर आणि टिकणारे सरकार आहे", असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. हे देखील वाचा- MSRTC Smart Card योजनेला मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ; मंत्री अनिल परब यांची घोषणा
तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले कौतूक करायला महाराष्ट्रात येणार असतील, मी त्यांच्या दौऱ्याचा चांगला अर्थ काढते. आपल्या सरकारला एक वर्ष होणार आणि देशाचे प्रधानमंत्री आपल्या जिल्ह्यातल्या ठिकाणी काम होतंय हे बघण्यासाठी येणार याच्यापेक्षा काय मोठे यश आपल्या सरकारचे असेल ? असेही त्या म्हणाल्या आहेत, याबाबत झी 24 तासने वृत्त दिले आहे.