Pandharpur Mangalwedha Assembly Constituency: पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघातून पार्थ पवार यांना उमेदवारी मिळणार? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोडले मौन
Ajit Pawar with Parth Pawar | (Photo Credits: Facebook)

दिवंगत आमदार भारत नाना भालके (Bharat Bhalke) यांच्या मृत्यूनंतर पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघाची (Pandharpur Mangalwedha Assembly Constituency) जागा रिक्त झाली आहे. यामुळे पंढरपूर- मंगळवेढा  विधानसभेच्या जागेवर पार्थ पवार (Parth Pawar) यांना उमेदवारी देण्यात येणार, अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून प्रसार माध्यमांत झळकत आहेत यावर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच पार्थ पवार यांच्या उमेदवारीचे वृत्त पूर्णपणे निराधार असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि मित्रपक्षांचे मत घेतल्यानंतरच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे अजित पवार म्हणाले आहेत.

"आमदार दिवंगत भारत भालके यांच्या निधनाने पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. तसेच या जागेवर पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांत दाखवल्या जात आहेत. मात्र, या बातम्यांना कोणताही आधार नाही. भारत नाना भालके यांच्या निधनाने आम्हाला मोठा धक्का बसला आहे. या जागेसंदर्भात बोलायचे झाले तर, स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी विचारविनिमय करुनच या पोटनिवडणुकीसाठी स्थानिक उमेदवार देण्यास प्राधान्य असणार आहे", असे अजित पवार म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Atul Bhatkhalkar: संजय राऊत यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करा; अतुल भातखळकर यांची केंद्र सरकारकडे मागणी

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील रिक्त जागेसाठी एकीकडे पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. तर, दुसरीकडे पंढरपूर येथे दिवंगत भारत नाना भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांच्या नावाचा आग्रह स्थानिक पातळीवर होताना दिसत आहे. यामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांनी 2019 मधील मावळ मतदारसंघांतून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा दारुण पराभव झाला होता. पार्थ यांच्या बाजूने पवार घराण्याची मोठी राजकीय ताकद आहे. 2019 च्या पराभवानंतर पार्थ पवार हे राज्याच्या राजकारणामध्ये कुठेही सक्रिय होताना दिसले नाहीत.