Minister of Social Welfare Vijay Wadettiwar (PC - Twitter)

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्व अटी-शर्थींचं पालन करुन राज्यभरात जिम सुरु करण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. ठाकरे सरकारने जिम सुरु करण्याचा निर्णय घेतला असून येत्या 2 दिवसात यासंदर्भात अधिकृत घोषणा केली जाईल, असं मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला बोलताना सांगितलं आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे राज्यात जीम सुरू करण्याची विनंती केली होती. तसेच काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील सरकारला राज्यातील जिम सुरु करण्याची मागणी केली होती. अखेर या मागणीला सरकारने परवानगी दिली असून लवकरचं यासंदर्भात अधिकृत घोषणा केली जाणार असल्यास वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. (हेही वाचा - कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वारसास 50 लाख रुपयांची मदत; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती)

यासंदर्भात बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यातील जिम सुरु करावी अशी अनेक दिवसांची मागणी होती. लॉकडाऊनमुळे जिम व्यावसाय अडचणीत होता. आरोग्याच्या दृष्टीनेही अनेकांच्या समस्या आहेत. म्हणून सरकारने जिम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसांमध्ये राज्यातील सर्व जीम चालकांना नियमावलीचं पालन करत जिम सुरु करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर राज्यात जिम सुरु करण्यात येतील, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांनी राज्यातील जिम सुरू करण्यात याव्यात, यासाठी सरकारकडे मागणी केली होती. सरकारने कोरोना संकटाचा विचार करून जिम सुरू करण्यास समर्थन दर्शवलं आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत यासंदर्भात अधिकृत घोषणा केली जाईल, असंही विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितलं.