बोरिवली (Borivali) येथील संजय गांधी नॅशनल पार्कमधील (Sanjay Gandhi National Park) 'बाजीराव' (Bajirao) या पांढऱ्या वाघाचा (White Tiger) आज (3 मे) मृत्यू झाला आहे. बाजीरावचे वय 18 वर्ष असून तो उद्यानातील सर्वात वृद्ध वाघ होता. वयोमानामुळे त्याचे निधन झाले असले तरी त्याचं शवविच्छेदन करण्यात आले अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून त्याची प्रकृती फारच खालावली होती. त्याचे चालणे-फिरणे देखील बंद झाले होते. संधीवात आणि स्नायुदुखीमुळे गेल्या 4 वर्षांपासून त्याला ग्रासले होते. त्यामुळे बाजीराववर उपचार सुरु होते.
2001 मध्ये जन्मलेल्या बाजीराववर शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात बाजीरावचे हृदय, यकृत, किडनी यासह इतर महत्त्वाचे अवयव निकामी झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.