देश आणि राज्य कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा सामना करत आहे. असे असताना पार्थ पवार (Parth Pawar) मात्र सिंगापूर येथे गेले असल्याची चर्चा होती. याबात विचारले असता गेल्या काही दिवसात पार्थ सिंगापूरला गेलाच नाही असे उपमुख्यमंत्री अजीत पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी सांगिते. यावर तशा बातम्याही आल्या होत्या असे पत्रकारांनी खोदून विचारले असता ''अरे बाबा मी स्वत: सागतोयकी तो सिंगापूर येथे गेला नव्हता. आता त्याचा बाप स्वत:च सांगतो आहे म्हटल्यावर प्रश्नच मिटला. हवं तर तुम्हाला त्याचा पासपोर्ट दाखवू का'', असा प्रतिप्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांना केला.
कोरोना व्हायरस नियंत्रणाबाबत राज्य सरकारने केलेल्या उपाययोजना आणि सध्यास्थिती यावर अजित पवार बोलत होते. या वेळी बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, प्रसंग कोणताही असो. नागरिकांनी गर्दी टाळायला हवी. एखादा दु:खद प्रसंग असो अथवा एखाद्याचा दहावा, बारावा असो गर्दी टाळायला हवी. ग्रामिण भागात तर लोक दारात मांडव घालून लग्नं करत आहेत. नागरिकांनी असे करु नये. गर्दी टाळली तरच या संकटाचा सामना करणे सोपे होईल.
दरम्यान, काही लोकांना वाटते की, कोरोना व्हायरस हा केवळ शहरामध्येच आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना त्याचा काहीही त्रास होणार नाही. पण, तसे अजिबात नाही. ग्रामीण भागातील जनतेनेही काळजी घेणे गरजेचे आहे. कोणताही आजार शहर, ग्रामीण असे काही नसते. सर्वांनीच दक्षता घेण्याची गरज असल्याचे अजित पवार यांनी या वेळी सांगितले. (हेही वाचा, Coronavirus: राज्य सक्षम, कोरोना नियंत्रणासाठी केंद्राकडे निधी मागण्याची गरज नाही: अजित पवार)
दरम्यान, कोरोना व्हायरस नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारच्या निधीची कमतरता राहणार नाही. त्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टींच्या खरेदीसाठी आर्थिक निर्बध हटविण्यात आले आहेत. कोरोना व्हायरस हा केवळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही येऊ शकतो. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनाही गर्दी टाळावी, काळजी घ्यावी असे अवाहन अजित पवार यांनी केले.