कोरोना व्हायरस (Coronavirus) नियंत्रणासाठी आवश्यक ते सर्व आर्थिक निर्णय घेतले आहेत. गरज असेल त्या ठिकाणचे आर्थिक निर्बंद हटविण्यात आले आहेत. कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्यासाठी राज्य आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. त्यासाठी केंद्राकडे मदत मागण्याची काहीही गरज नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी ठणकावून सांगितले. कोरोना व्हायरस नियंत्रणासाठी केंद्राकडे आर्थिक मदत मागणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे कोरोना व्हायरस नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेस विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते. या वेळी अजित पवार यांनी पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना मनमोकळी आणि तपशीलवार उत्तरे दिली. (हेही वाचा, Coronavirus: प्रसंग कोणताही असो, नागरिकांनी गर्दी टाळा: अजित पवार)
दरम्यान, कोरोना नियंत्रणासंदर्भात एका आदेशाची नस्ती अजित पवार यांच्याकडे आली. या वेळी ते पत्रकार परिषदेत होते. मात्र, पत्रकार परिषदेत असतानाच अजित पवार यांनी संबंधितांना सांगितले की, याबाबत कारवाई करा. या आदेशावर मी आल्यानंतर सही करतो. या वेळी अजित पवार म्हणाले की, कोरोना व्हायरस बाबत सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. कोणत्याही स्थितीत गर्दी मात्र टाळायला हवी.