कोरोनामुळे व्यक्तीचा मृत्यू होत असल्याचा काय पुरावा आहे? वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा राज्य सरकारला सवाल

कोरोनाने संपूर्ण भारताला हादरून सोडले आहे. देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. तसेच कोरोनामुळे मरण पावणाऱ्यांच्या आकड्यातही झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 64 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, कोरोनामुळे मृत्यू होत नाहीत, तर सर्व मृत्यू नैसर्गिक आहेत, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. तसेच कोरोनाच्या संसर्गामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होत असल्याचा काय पुरावा आहे? असा प्रश्नही त्यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच बीबीसी मराठीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांनी कोरोनाबाबत आपली भुमिका मांडली आहे. ”जो माणूस जन्माला आला, त्याचा मृत्यू एकादिवशी होणारच. जर 10 कोटी लोकांमध्ये 200-250 लोकांचा मृत्यू झाला, तर त्यात नवीन काय आहे? भारतीय स्वत:शी तर लढत असतात, पण निसर्गाशी लढण्याचा आव आणत असतो. यापेक्षा मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला, तर मी मान्य करेल. कोरोनामुळे हे मृत्यू होत नाहीत. सर्व मृत्यू नैसर्गिक आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे व्यक्तीचा मृत्यू होत असल्याचा काय पुरावा आहे? कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, असा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे का? माझा यावर आजिबात विश्वास नाही. कारण मी माणस जगताना बघतोय”, असे आंबेडकर यांनी म्हंटले आहे. हे देखील वाचा- Ganapati Immersion 2020: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवासस्थानीच केले गणपतीचे विसर्जन; पाहा संपूर्ण व्हिडिओ

नुकतेच प्रकाश आंबेडकर यांनी धार्मिक स्थळे उघडण्याबाबत पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरासमोर आंदोलन केले होते. “सरकारला कोरोनाविषयी काहीही कल्पना नाही, असे मला वाटते. दुकाने सुरू करण्यासाठी, एसटी सुरू करण्यासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन करावे लागत आहे. आज मंदिर उघडा, यासाठी आंदोलन केले. हे सरकार कोरोनाच्या नावावर लोकांची फसवणूक करत आहे. कोरोना आहे, यावर माझा विश्वास नाही”, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.