शिवसेना मुख्य प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मुंबईमधील निवासस्थानी आज सकाळी ईडी ने धाड टाकली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून ईडीच्या (ED) 3 टीम्स काम करत आहेत. दरम्यान ही कारवाई ईडीकडून पत्राचाळ आर्थिक गैर व्यवहार प्रकरणी (Patra Chawl Land Scam Case) सुरू आहे. मागील काही महिन्यात संजय राऊत यांची ईडी कार्यालयामध्येही चौकशी झाली होती. संजय राऊत यांनी संसदेच्या अधिवेशनाचं कारण देत दोनदा ईडी समन्स देऊनही ते हजर राहिले नव्हते तेव्हा आता ईडीच थेट संजय राऊत यांच्या घरी चौकशीला दाखल झाले आहे. मग जाणून घ्या नेमक्या कोणत्या आरोपांखाली संजय राऊतांची चौकशी सुरू आहे आणि नेमकं पत्राचाळ प्रकरण काय आहे?
जाणून घ्या पत्राचाळ प्रकरण काय आहे?
गोरेगाव मधील पत्राचाळीतील म्हाडा भुखंड होता. हा भुखंड विकसित करण्यासाठी संजय राऊत यांचे बंधू प्रविण राऊत यांच्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात आले होते. पण ईडीच्या आरोपांमध्ये या विकास कामातील काही जागा खाजगी विकासकांना विकला आहे. यामध्ये पत्राचाळीतील नागरिकांची फसवणूक झाली आहे. गुरू आशिषला चाळीतून 3 हजार फ्लॅट्स बांधण्याचं काम होते. त्यापैकी 672 फ्लॅट्स हे भाडेकरूंना आणि उरलेले फ्लॅट्स म्हाडा व विकासक यांच्यामध्ये वाटण्यात आले. दरम्यान 2010 मध्ये प्रविण राऊतांच्या कंपनीचे 258% शेअर्स HDIL कंपनीला विकण्यात आले आणि पुढे 3 वर्ष टप्प्याटप्प्याने भूखंडाचे भाग अन्य खाजगी बिल्डर्सला देण्यात आले. राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि अन्य संचालकांना घेऊन FSI ची विक्री करून बेकायदेशीरपणे 1074 कोटी जमावले आहेत. यामध्ये पत्राचाळीचा पुनर्विकास देखील करण्यात आलेला नाही. पण त्याच्या आधारातून बॅंकेतून 95 कोटींचे कर्ज मिळवले आहे.
दरम्यान या व्यवहारामधील पैसा प्रविण राऊत यांचे मित्र, कुटुंब यांच्या खात्यामध्ये वळवण्यात आले आहेत. त्यामध्ये 83 लाख रूपयांचा व्यवहार प्रविण यांच्या पत्नी माधुरी आणि संजय यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात जमा करण्यात आले. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी या व्यवहारामधूनच दादर मध्ये घर विकत घेतले आहे. असा ईडीचा संशय आहे. वर्षा राऊत यांनी याप्रकरणी 55 लाख रूपये माधुरी यांना परत केले आहेत. त्या व्यवहारावरूनही ईडीने वर्षा राऊत यांना नोटीस बजावली आहे. ईडी कडून राऊतांच्या पालघर मधील जमीन, दादर मधील घर सह 8 भूखंडांवर टाच आणली आहे. हे देखील नक्की वाचा: Sanjay Raut On ED Raid: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेत संजय राऊत यांनी घोटाळ्याचे आरोप फेटाळले; पहा ट्वीट्स!
प्रवीण राऊत हे गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत आणि संजय राऊतांचे निकटवर्तीय आहेत.