माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेना पक्षावर (ShivSena) निशाणा साधला आहे. शिवसेना ही ढोंगी आहे. आपल्या सोयीप्रमाणे ते झाडांच्या कत्तलीसाठी विरोध करतात, असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे. औरंगाबाद येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी हजारो झाडांची कत्तल करण्यात येणार आहे, अशी बातमी एका वृत्तापत्रात छापून आल्यानंतर या बातमीचा फोटो काढून अमृता फडणवीस यांनी ट्विट केले आहे. यामुळे अमृता फडणवीसदेखील राजकारणात सक्रीय होत असल्याचे चिन्ह दिसत आहेत.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील कामाला स्थगिती दिली होती. परंतु, औरंगाबाद येथे बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासाठी 1 हजार झाडांची तोडणी करण्यात येणार आहे, अशा चर्चांना उधाण आले होते. यावरुन अमृता फडणवीस यांनीही शिवसेना पक्षावर टीका केली आहे. शिवसेना ही ढोंगी आहे. आपल्या सोयीप्रमाणे ते झाडांच्या कत्तलीला विरोध करतात. तसेच शिवसेना कमिशनखोरी आहे. त्यांच्या ढोंगीपणाचा आजार लवकर बरा होईल. असे अमृता फडणवीस यांनी ट्वीट केले आहे. हे देखील वाचा- चेंबूर: मेहूण्याच्या साथीने भावाची हत्या करुन मृतदेह रेल्वे रुळावर फेकणाऱ्या बहिणीला अटक

अमृता फडणवीस यांचे ट्वीट-

अमृता फडणवीस यांनी केलेल्या ट्वीटला शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी उत्तर दिले आहे. अमृता फडणवीस यांनी केलेल्या ट्वीटमध्ये काही तथ्य नाही. औरंगाबादचे महापौर यांनी स्पष्ट केले आहे की, आम्ही कोणतेही झाड कापणार नाही, असे प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या आहेत.