मुंबई: पश्चिम रेल्वेने E- Tailers सोबत मिळून सुरु केली अनोखी सेवा; आता ग्राहकांना सामानाची ऑनलाईन डिलेव्हरी जवळच्या स्थानकातून घेता येणार; वाचा सविस्तर
Western Railway Stations To Get Online Delivery Points (Photo Credits: File Image)

घड्याळाच्या काट्याप्रमाणे धावत जगणाऱ्यांना ऑनलाईन शॉपिंगमुळे (Online Shopping) बरीच मदत झाली आहे. पण अनेकदा या सामानाची डिलेव्हरी घेण्यासाठी घरी कोणी नसल्याने पंचाईत होते. अशा मंडळींसाठी आता पश्चिम रेल्वे (Western Railway) ऑनलाईन कंपन्यांसोबत मिळून एक खास सुविधा तयार करणार आहे. यानुसार काही प्रमुख स्थानकांवर डिलेव्हरी स्टेशन्स सुरु करण्यात येणार आहेत ज्या मार्फत ग्राहकांच्या ऑनलाईन ऑर्डर्स घरी जाण्याऐवजी स्थानकात स्वीकारल्या जातील आणि मग ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार आपली वस्तू या स्टेशनवरून घेता येणार आहे. अशा प्रकारची सेवा सध्या सीएसएमटी स्थानकात उपलब्ध आहे तर पश्चिम मार्गावर वसई (Vasai), बोरिवली (Borivali) , चर्चगेट (Churchgate) या स्थानकात ही सोय उपलब्ध करण्याचा रेल्वेचा विचार आहे. मुख्य म्हणजे ही सुविधा पूर्णतः मोफत दिली जाणार आहे.

प्राप्त माहितीनुसार, संबधित डिलेव्हरी स्टेशन हे ऑनलाईन कंपन्यांकडून सुरु केले जाणार आहे. यामार्फत रेल्वे स्थानकावरील जागा ही कंपन्यांना एक ठराविक रक्कम देऊन बुक करायची आहे.ग्राहकांना आपल्या घरच्या पत्त्याऐवजी या स्थानकाच्या डिलिव्हरी पॉईंटचा पत्ता द्यायचा आहे, ज्यावेळी ही डिलिव्हरी घेतली जाईल तेव्हा ग्राहकाला एक नोटिफिकेशन पाठवण्यात येईल, आणि आपण जेव्हा ही डिलिव्हरी घेण्यासाठी जाल तेव्हा नोटिफिकेशनमध्ये आलेला ओटीपी दाखवून तुम्ही ओळख पटवून वस्तू घेऊ शकता. (ऑनलाईन खरेदीवर अशा पद्धतीने असते गुगल ची करडी नजर)

साहजिकच यामार्फत पश्चिम रेल्वेची तिकीट व्यतिरिक्त मिळकत वाढण्यास मदत होईल तर उत्तम सोय दिल्यास ऑनलाईन व्यापाराला चणा मिळेल असा यामागील हेतू आहे. असं असलं तरीही रेल्वेच्या प्रवाशांना यामुळे कोणताही त्रास होणार नाही याची काळजी प्रथम घेतली जाईल असे स्पष्टीकरण पश्चिम रेल्वेने दिले आहे.