Monsoon Update: मान्सून दाखल तर झाला पण सर्वत्र बरसणार कधी? हवामानाचा अंदाज घ्या जाणून
Monsoon Rain | Representative image (Photo Credit- Pixabay)

Weather Forecast Today: मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला असून हळूहळू पुढे सरकत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम किनारपट्टीवर अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नैर्ऋत्य मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. महाराष्ट्रात दाखल झाल्यावर मान्सूनने रविवारी गोवा, सिंधुदुर्गासह रत्नागिरीपर्यंत मजल मारली. दरम्यान, आता पुढच्या 48 तासांमध्ये मान्सून महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, असे असले तरी खरीपाच्या पेरणीसाठी आवश्यक पाऊस बरसण्याास आणखी काही काळ वाट पाहावी लागू शकते, असा अंदाज (Weather Forecast) भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे.

चक्रीवादळ बिपरजॉय मान्सूनच्या प्रवासात मुख्य अडथळा ठरले आहे. चक्रीवाळ सध्या अत्यंत सावकाशपणे उत्तरेच्या दिशेने सरकत आहे. बिबरजॉय जसजसे उत्तरेकडे सरक आहे तसतसे मौसमी वारे सक्रिय होऊ लागले आहे. मौसमी वाऱ्यासह मान्सूनने रविवारी संपूर्ण गोवा, सिंधुदुर्गासह रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या काही भागात हजेरी लावली. हवामान खात्याने म्हटले आहे की, पुढचे 48 तास महत्त्वाचे आहेत. या काळात मान्सून कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग व्यापत पश्चिम बंगाल राज्याच्याही काही प्रदेशांमध्ये उपस्थिती दर्शवू शकतो. (हेही वाचा, Maharashtra Monsoon Update: दक्षिण कोकणात व दक्षिण मध्य महाराष्ट्रात मान्सून दाखल; पुढील 4 ते 5 दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता)

हवामान विभागाने कृषी क्षेत्राचा विशेष उल्लेख करत म्हटले आहे की, किनारपट्टीवर मानसूनचा विशेष प्रभाव आणि उपस्थितीत दिसत असली तरी शेतकऱ्यांनी मशागत करुन ठेवावी. मात्र पेरणीची घाई करु नये. जोपर्यंत पाऊस पुरेसा पडत नाही. तोवर शेतकऱ्यांनी आगोदरच पेरणी करुन ठेऊ नये. हवामान विभागाने इशारा दिला असला तरी, राज्यातील शेतकरी पावसाची वाट पाहात आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.

दरम्यान, मान्सूनव्यतिरीक्त हवामानाबद्दल इतर अंदाज व्यक्त करताना आयएमडीने मंगळवारी म्हटले की, देशातील अनेक राज्यांना पुढील काही दिवसांसाठी उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. या राज्यांमध्ये तेलंगणा, आंध्र प्रदेश, बिहार आणि ओडिशा यांचा समावेश आहे. पुढील दोन दिवसांत छत्तीसगड, ओडिशा आणि किनारी आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये भागात उष्णतेच्या लाटेची तीव्र परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.