Water Taxi: नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; उद्यापासून सुरु होणार बेलापूर जेट्टी ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत वॉटर टॅक्सी, जाणून घ्या दर
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

नवी मुंबईकरांसाठी (New Mumbai) आनंदाची बातमी आहे. शहरात 7 फेब्रुवारी, मंगळवारपासून बेलापूर जेट्टी ते दक्षिण मुंबईतील गेटवे ऑफ इंडियापर्यंत वॉटर टॅक्सी (Water Taxi) सेवा सुरू होणार आहे. या वॉटर टॅक्सी सेवेमुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. या सेवेमुळे बेलापूरहून दक्षिण मुंबईत अवघ्या 60 मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे. नवी मुंबईतून चालणाऱ्या वॉटर टॅक्सी शहराला मुंबई, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, एलिफंटा लेणी आणि रेवस यांना जोडतील. या सर्व सेवा टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केल्या जातील.

वॉटर टॅक्सी, 'नयन XI' मध्ये खालच्या डेकवर 140 प्रवासी आणि वरच्या किंवा बिझनेस क्लासच्या डेकवर अतिरिक्त 60 प्रवासी बसू शकतील. ही टॅक्सी बेलापूरहून सकाळी 8.30 वाजता निघेल आणि 9.30 वाजता गेटवे ऑफ इंडियाला पोहोचेल. त्यानंतर वॉटर टॅक्सी संध्याकाळी 6.30 वाजता नवी मुंबईसाठी निघेल आणि संध्याकाळी 7.30 वाजता ती बेलापूर जेट्टीवर पोहोचेल. ऑपरेटरने जारी केलेल्या निवेदनात हे नमूद केले आहे. (हेही वाचा: मुंबईत विषाणूजन्य आजारानंतर लहान मुलांमध्ये वाढतोय खोकला; प्रदूषण व धुक्यामुळे वाढत आहे श्वासोच्छवासाची समस्या)

वेबसाईटद्वारे या तिकिटांची विक्री उपलब्ध होणार आहे. खालच्या डेकसाठी 250 रुपये आणि वरच्या किंवा व्यवसाय वर्गाच्या डेकसाठी 350 रुपये दर आकारले जातील. दरम्यान, नोव्हेंबरमध्ये नयनतारा शिपिंग कंपनीने मुंबई ते मांडवा दरम्यान वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. मुंबई क्रूझ टर्मिनल ते मांडवा अशी वॉटर टॅक्सी 1 नोव्हेंबरपासून सुरू झाली. या मार्गावर वॉटर टॅक्सी सुरू झाल्याने मुंबई ते मांडवा हा प्रवास अवघ्या 45 मिनिटांत पूर्ण करणे शक्य होत आहे.

मुंबई मांडवा वॉटर टॅक्सीमधील लोअर डेक आणि एक्झिक्युटिव्ह डेकसाठी असलेले भाडे अनुक्रमे 150 आणि 100 रुपयांनी कमी करण्यात आले आहे. आता लोअर डेकचे भाडे 400 रुपयांवरून 250 रुपये आणि वरच्या किंवा एक्झिक्युटिव्ह डेकसाठी भाडे 450 रुपयांवरून 350 रुपयांवर आले आहे.