Water Cut in Ghatkopar: घाटकोपर, भांडुप आणि मुलुंडमध्ये 24 ते 25 मे दरम्यान पाणीपुरवठा बंद; घ्या अधिक जाणून
Water Cut | Representational & Edited Image (Photo Credits: Pixabay)

BMC Water Supply Cut: घाटकोपर (Ghatkopar), भांडुप (Bhandup) व मुलुंड (Mulund ) परिसरात 24 ते 25 मे दरम्यान पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मुंबई महापालिका पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. शुक्रवारी सकाळी 11.30 ते शनिवारी सकाळी 11.30 पर्यंत 24 तास पाणीपुरवठा खंडित (Water Supply Cut in Ghatkopar) राहणार आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत मुलुंड परिसरातील फोर्टीस रुग्णालय ते उद्योग क्षेत्रालगत असलेली १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी वळविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या काळात पाणीपुरवठा बंद असणार आहे. अधिक माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता येथील उड्डाणपुलाच्या कामात जलवाहिनीमुळे सातत्याने अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे ती इतरत्र वळविणे आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

पाणीपुरवठा खंडीत होण्याचे कारण

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) हे काम GMLR प्रकल्पाचा एक भाग म्हणून हाती घेत आहे. त्यामुळे पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 24 मे रोजी सकाळी 11.30 वाजल्यापासून 25 मे रोजी सकाळी11.30 या वेळेत महानगरपालिकेतर्फे दोन ठिकाणी 1200 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम मुलुंड (पश्चिम) येथील गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यालगत केले जाणार आहे. दरम्यानच्या काळात, घाटकोपर, भांडुप व मुलुंड विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. (हेही वाचा, Mumbai Water Cut Suspended: बीएमसी कडून मुंबई मधील 22-23 मे दरम्यान ची पाणी कपात रद्द)

कोणत्या भागात असेल पाणीपुरवठा खंडीत?

1) एन विभाग:

विक्रोळी गाव (पूर्व), गोदरेज प्रॉपर्टीज, गोदरेज रुग्णालय.

पाणीपुरवठा बंद कालावधी- 25 मे रोजी मध्यरात्रीनंतर 3.30 ते सकाळी11.30

2) एस विभाग:

नाहूर (पूर्व), भांडुप (पूर्व), कांजूर (पूर्व) चा संपूर्ण परिसर, टागोर नगर संपूर्ण परिसर, कन्नमवार नगर विक्रोळी (पूर्व) येथील इमारत क्रमांक 1 ते 32 व 203 ते 217

पाणीपुरवठा बंद कालावधी- 25 मे रोजी मध्यरात्रीनंतर 3.30 ते सकाळी11.30

मुलुंड-गोरेगाव जोडरस्ता लगतचा परिसर (ऐशफोर्ड टॉवर, रुणवाल टॉवर, फोर्टिस रुग्णालय ते सोनापूर वाहतूक दिव्यापर्यंतचा परिसर), सीएट टायर मार्ग लगतचा परिसर (सुभाषनगर, एम. एम. आर. डी. वसाहत), गाव रोड, दत्त मंदीर मार्ग, अंजना इस्टेट, शास्त्री नगर, उषा नगर, लाल बहादूर शास्त्री मार्ग लगतचा परिसर (भांडुप पश्चिम), सोनापूर, गावदेवी मार्ग, जंगल मंगल मार्ग, लेक मार्ग, द्राक्ष बाग, काजू टेकडी, जनता मार्केट, टँक रोड परिसर, महाराष्ट्र नगर, कोकण नगर, सह्याद्री नगर, क्वारी मार्ग व प्रतापनगर मार्ग लगतचा परिसर

पाणीपुरवठा बंद कालावधी- 25 मे रोजी पहाटे 5 ते सकाळी 10.00

3) टी विभाग – मुलुंड-गोरेगाव जोडरस्ता लगतचा परिसर (मुलुंड पश्चिम), लाल बहादूर शास्त्री मार्ग लगतचा परिसर (मुलुंड पश्चिम), जे. एन. मार्ग, देवीदयाल मार्ग, क्षेपणभूमी मार्ग (डम्पिंग रोड), डॉ. आर. पी. मार्ग, पी. के. मार्ग, झवेर मार्ग, एम. जी. मार्ग, एन. एस. मार्ग, एस. एन. मार्ग, आर. एच. बी. मार्ग, वालजी लाढा मार्ग, व्ही. पी. मार्ग, मदन मोहन मालविय मार्ग, एसीसी मार्ग, बी. आर. मार्ग, गोशाळा मार्ग, एस. एल. मार्ग, नाहुर गाव

पाणीपुरवठा बंद कालावधी- 25 मे रोजी 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

महापालिकेने घाटकोपर, भांडुप व मुलुंड विभागातील पाणीपुरवठा खंडीत केल्या जाणाऱ्या नागरिकांना अवाहन केले आहे की, त्यांनी पाणी काटकसरीने वापरावे. तसेच, पाणीपुरवठा पुन्हा सुरु झाल्यानंतर काही काळ तो कमी दाबाने सुरु राहील. नागरिकांनी पुढचे साधारण पाच दिवस पाणी गाळून, उकळून थंड करुन वापरावे. पाण्याच्या बाबतीत काही समस्या असतील तर पालिकेशी संपर्क साधावा असेही अवाहन करण्यात आले आहे.