सर्वसामान्यपणे लोक आपल्या स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी आपली आयुष्यभराची कमाई खर्च करतात. जर तुम्हीही घर घेण्याचा विचार करत असाल तर काळजी घेण्याची गरज आहे. साधारण 3 महिन्यांच्या कठोर परिश्रमानंतर, महारेराने (MahaRERA) महाराष्ट्रातील अशा 308 गृहनिर्माण प्रकल्पांची ओळख पटवली आहे, ज्यांच्या बिल्डरांविरुद्ध नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलमध्ये (NCLT) दिवाळखोरीची कारवाई सुरू आहे.
याचा अर्थ या या बांधकाम व्यावसायिकांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे आणि यापैकी काही दिवाळखोर देखील होऊ शकतात. अशा परिस्थितीत या बिल्डर्सद्वारे सुरु असणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये घर खरेदी करणाऱ्यांचे कष्टाचे पैसे बुडू शकतात. या बिल्डरांची यादी महारेरा वेबसाइटवर उपलब्ध आहे.
महारेराने ओळखलेल्या 308 गृहनिर्माण प्रकल्पांपैकी 115 चालू आहेत तर 193 बंद आहेत किंवा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये मुंबई महानगर क्षेत्रातील 233, पुण्यातील 63, अहमदनगरमधील 5, सोलापूरमधील 4 आणि रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि सांगली येथील प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश आहे. या 308 प्रकल्पांपैकी सर्वाधिक 100 प्रकल्प ठाणे जिल्ह्यात आहेत. त्यापाठोपाठ मुंबई उपनगरात 83 आणि मुंबई शहरात 15 प्रकल्प आहेत. पुणे जिल्ह्यातील 63 प्रकल्पही या यादीत आहेत. (हेही वाचा: Barsu Refinery in Ratnagiri: बारसू रिफायनरी बाबत शरद पवार यांनी केली CM Eknath Shinde यांच्यासोबत फोन वरून बातचीत)
महारेराने सखोल चौकशीनंतर 308 प्रोजेक्ट्स बिल्डर्सची ओळख पटवली आहे. रिअल इस्टेट रेग्युलेटरने आपल्या वेबसाइटवर संबंधित बिल्डर्सची नावे प्रसिद्ध करून सर्वसामान्यांना सतर्क केले आहे. या प्रकल्पांना कर्ज देणाऱ्या बँका आणि वित्तीय संस्थांनी संबंधित बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध एनसीएलटीमध्ये खटला दाखल केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, नुकतेच सिडकोने (CIDCO) नवी मुंबई शहरातील 529 अनधिकृत बांधकामांची यादी प्रसिद्ध केली आहे. नियोजन संस्थेने यापूर्वीच बेकायदा बांधकामांना नोटिसा बजावल्या आहेत.