वर्धा (Wardha) जिल्ह्यामध्ये देवळी तील नागझरीत पशुवैद्यकीय दवाखान्यात काम करणार्या किसन ढगे या 29 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही आत्महत्या या तरूणाने एमपीएससी परीक्षेमध्ये (MPSC Exam) आलेल्या अपयशातून केल्याचं समोर आले आहे. किसनने एक सुसाईड नोट लिहली असून त्यामध्ये आईवडिलांनी शेती विकून शिक्षणावर खर्च केला पण नोकरी मिळत नसल्याने निराशेने आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे.
किसन ढगे हा नागझरीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात मागील 7 वर्षांपासून शिपाई पदावर काम करत आहे. देवळीत भाड्याने राहून तो एमपीएससीची परीक्षा देत होता. मोठ्या पदावर जाऊन काम करण्याच्या त्याच्या स्वप्नामध्ये त्याच्या सध्याच्या कामाच्या ठिकाणी असलेले सुपरवायझर देखील मदत करत होते पण यश मिळत नसल्याने तो नैराश्यात गेला होता.
पोलीस उपनिरीक्षक बनण्याची संधी थोडक्यात हुकली होती. याच परीक्षेत किसनच्या मित्रांना यश मिळाल्याने तो उदास होता. आत्महत्येच्या दिवशी त्याने मित्रांसोबत देवळीत जेवण केले. त्यानंतर नागझरी येथील दवाखान्यात गेल्यावर त्याने फेसबुकवर पोस्ट टाकून नोकरीचा भरती घोटाळा आणि आरोग्यमंत्री, संबंधित मंत्री यांच्या कार्यपद्धतीचा निषेध करुन आत्महत्या करीत असल्याचे लिहले. किसनच्या सुसाईट नोटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या घरच्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणीही केली आहे.
किसनच्या मित्रांना ही फेसबूक पोस्ट पाहताच धक्का बसला त्यांनी तातडीने त्याच्याकडे धाव घेतली पण तत्पूर्वी किसनने आत्महत्या करत जीवन संपवलं होतं. कामाच्या ठिकाणीच त्याने गळफास घेतला. त्याच्या आत्महत्येचं वृत्त समजताच घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह पोलिसांनी पुलगाव हॉस्पिटलमध्ये पाठवला. त्याचं पोस्टमार्टम करून मृतदेह नातेवाईकांकडे नंतर देण्यात आला.