Shivaji Maharaj's Wagh Nakh (PC - Twitter/@MeghUpdates)

Wagh Nakh: छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे शाहूनगरी सातारा (Satara) येथे 19 जुलै 2024 रोजी प्रदर्शनासाठी दाखल होणार आहेत. या ऐतिहासीक घटनेचे स्वागत करण्यासाठी सातारा जिल्हा सज्ज असून, हा सोहळा अत्यंत दिमाखदार व राजेशाही थाटात व्हावा, यासाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी करावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. वाघ नखांच्या स्वागताचे नियोजन करण्याची प्रशासनाची बैठक पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.

या बैठकीनंतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी ‍जितेंद्र डुडी व इतर प्रमुख अधिकाऱ्यांसह छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन दालनांची पाहणी केली व सूचना केल्या.

छत्रपती शिवाजी महाराजांची ही पवित्र वाघनखे येत्या 19 जुलै पासून साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात प्रदर्शित केली जाणार असून, जनतेला त्याचे दर्शन घेता येईल. या वाघनखांच्या स्वागताचा दिमाखदार सोहळा आयोजित केला आहे. एकूण सात महिने ही वाघनखे शिवाजी महाराज संग्रहालयात असणार आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला या वाघनखांचे दर्शन घेण्याची संधी मिळावी यासाठी नेटके नियोजन प्रशासनाने केले आहे.

वाघनखांच्या स्वागत सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रण देण्यात आले आहे. या स्वागत सोहळ्यासाठी संपूर्ण शहर व जिल्हाभर स्वागत कमानी उभारण्यात येऊन बॅनर्स, पोस्टर्स, संग्रहालया भोवतालची अतिक्रमणे काढून स्वच्छता करण्यात यावी.   संग्रहालयाची सजावट, विद्युत रोषणाईवरही विशेष भर देण्यात येणार आहे.

व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम, लंडन येथून वाघनखे आणण्यात येणार असून ही शिवकालीन वाघनखे संग्रहालयातील दालन क्रमांक 3 मध्ये ठेवण्यात येणार आहेत.  वाघनखाच्या संरक्षणाकरीता सीसीटीव्ही कॅमेरे, सेन्सार त्याचप्रमाणे संरक्षण यंत्रणेमार्फत बंदोबस्त चोख ठेवण्यात आलेला आहे. दररोज सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी 2 शाळेच्या विद्यार्थ्यांना वाघनखे पाहण्यास निशुल्क उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. इतर प्रेक्षकांना 10 प्रमाणे तिकीट आकारण्यात येणार आहे. सकाळी  10 ते 5 या वेळेत वाघनखे पाहण्यास खुले राहणार आहे.