Sanjay Raut On PM Narendra Modi: दिल्लीतील पुतीन ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या माध्यमातून बॉम्ब, मिसाईल सोडातात- संजय राऊत
Sanjay Raut, PM Narendra Modi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. रशिया युक्रेन युद्धाचा दाखला देत राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांच्याशी तुलना केली आहे. केंद्रात बसलेले पुतीन आमच्या विरोधात दररोज आमच्या ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या माध्यमातून बॉम्ब, मिसाईल सोडतात असे राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाराष्ट्रात पडत असलेल्या धाडींच्या पार्श्वभूमीवर हे भाष्य केले आहे. ते नागपूर येथे शिवसंपर्क अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

आपल्या देशात युद्ध नाही. तरीही आमच्यासारखे लोक दररोज युद्धाचाच अनुभव घेत आहेत. दिल्लीत एक पुतीन बसले आहेत. दिल्लीतील हे पुतीन दररोज आमच्यावर ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स अशा केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून आमच्यावर बॉम्ब आणि मिसाईल सोडत आहेत. दररोज नवनवेच मिसाईल येते आहे. आम्ही त्याच्यातून वाचत आहोत, असे सांगतानाच महाराष्ट्रावर अशा प्रकारचे हल्ले करणे योग्य नाही, असेही संजय राऊत यांनी या वेळी म्हटले. (हेही वाचा, Sanjay Raut on ED: 'केंद्रीय तपास यंत्रणा हुकुमशाहाच्या गुलामांप्रमाणे वागत आहेत', श्रीधर पाटणकर यांच्यावरील कारवाईवर शिवसेना खसादर संजय राऊत)

जे आपल्या विचारांशी सहमत नाहीत अशांचा आदर करणे हिच खरी लोकशाही आहे. ज्या राज्यांमध्ये विरोधी पक्षांची सरकारे आहेत त्यांच्याशी अधिक सन्मानाने वागावे हे आम्हाला पंडीत नेहरु यांनी शिकवले आहे. आजकाल देशामध्ये असे पाहायला मिळत नाही, अशी खंतही राऊत यांनी यावेळी बोलून दाखवली. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावण्यास मात्र संजय राऊत विसरले नाहीत. मी पुन्हा येईन.. असे म्हणनारेही आज संध्याखाली इकडे येणार आहेत. त्याही वेळी मी इथे येईन आणि त्यांच्या बाजूला बसेन असे संजय राऊत म्हणाले.