महाराष्ट्रामध्ये एकीकडे कोरोना संकट गंभीर होत असताना दुसरीकडे हॉस्पिटलमधील दुर्घटनांचे सत्र कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. आधी भंडारा रूग्णालयात आग नंतर नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे रूग्ण दगावले आणि आता काल रात्री विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयात आग लागल्याने 13 जण होरपळून मृत्यूमुखी पडल्याची घटना समोर आली आहे. देशभरातून या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला जात आहे. दरम्यान मुख्यमंट्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील याबाबत शोक व्यक्त करत मृतांच्या वारसांना मदतीचा हात दिला आहे. या दुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांना एकूण 7 लाखांची मदत जाहीर झाली आहे. नक्की वाचा: Virar Covid Care Fire: विजय वल्लभ कोविड केअरच्या ICU विभागात आग; 13 जणांचा मृत्यू.
सकाळी पंतप्रधान कार्यलयातून विरार दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करताना PMNRF कडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 2 लाखांची मदत तर गंभीररित्या जखमींच्या कुटुंबांना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
पीएमओ ट्वीट
PM @narendramodi has approved an ex-gratia of Rs. 2 lakh each from PMNRF for the next of kin of those who have lost their lives due to the hospital fire in Virar, Maharashtra. Rs. 50,000 would be given to those seriously injured.
— PMO India (@PMOIndia) April 23, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सकाळी विरारच्या दुर्घटनेची दखल घेतली आहे. यामध्ये विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयातील आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख आणि गंभीर जखमी रुग्णांना प्रत्येकी 1 लाख रुपये मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे.
सीएमओ ट्वीट
विरार येथील विजय वल्लभ रूग्णालयातील आगीत मृत्युमुखी पडलेल्या रूग्णांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख आणि गंभीर जखमी रूग्णांना प्रत्येकी १ लाख रुपये मदत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केली आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 23, 2021
दरम्यान ही दुर्घटना काल रात्री साडेतीन च्या सुमारास घडली आहे. त्यानंतर आज सकाळी पालघरचे पालकमंत्री दादा भुसे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत घटनेची पाहणी केली आहे. या दुर्घटनेमध्ये जबाबदार असणार्यांना कडक शासन केले जाईल असे सांगताना या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असे देखील आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.