Oxygen Tank Leaked

महाराष्ट्रात कोविड 19 च्या रूग्णांना एकीकडे वेळेत ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर मिळत नसल्याने उपचाराअभावी रूग्ण दगावत असल्याचं चित्र असताना आता नाशिकच्या झाकीर हुसेन हॉस्पिटल (Zakir Hussain Hospital) मध्ये ऑक्सिजन प्लांट मध्ये गळती झाल्याचं वृत्त काही वेळापूर्वी समोर आलं होतं. पण या दुर्घटनेमध्ये 10 ते 11 रूग्ण दगावल्याची प्राथमिक माहिती नाशिक मनपा आयुक्त यांनी दिली होती. त्यानंतर आता नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे तेथे पोहचल्यानंतर दिलेल्या माहितीनुसार मृतांचा आकडा 22 वर पोहचला आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये ही गळती वॉल्व लिकेजमुळे झाली आहे. दरम्यान काही काही वेळातच तांत्रिक दुरूस्ती नीट करण्यात आली असून ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे असे सांगण्यात आले आहे.

नाशिक मनपा आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर मिळून 150 जणांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जात होता त्यापैकी 23 व्हेंटिलेटर वर होते पण अचानक गॅस गळती झाल्याने 10-11 जणांचा नाहक जीव गेला आहे. ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची प्रतिक्रिया 

सध्या नाशिक मधील झाकीर हुसेन हॉस्पिटल मध्ये झालेल्या याप्रकारावरून राजकारण देखील सुरू झालं आहे. ऑक्सिजन प्लांटच्या देखभालीची जबाबदारी नेमकी कुणाची यावरून देखील आरोप प्रत्यारोप होत असल्याचं समोर आलं आहे. सध्या पोलिस आणि रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सचे कर्मचारी हॉस्पिटल परिसरामध्ये दाखल झाले आहेत.