Pramod Khandate, Civil Surgeon, Bhandara (Photo Credits: ANI)

भंडारा (Bhandara) जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर येत आहे. भंडारा जिल्हा रुग्णालयाला (Bhandara District General Hospital) लागलेल्या आगीत  10 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. तर 7 बालकांना आगीपासून वाचवण्यात यश आले आहे. एएनआय (ANI) ने दिलेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्हा जनरल हॉस्पिटलच्या सिक न्यू बॉन केअर युनिट (Sick Newborn Care Unit) मध्ये रात्री 2 वाजल्याच्या सुमारास आग लागली. त्यात 10 नवजात बालकांचा दुर्दैवी अंत झाला. तर 7 जणांना सुखरुप वाचवण्यात आले, अशी माहिती भंडाऱ्याचे सिव्हिल सर्जन प्रमोद खंडाटे (Pramod Khandate) यांनी दिली आहे. (मुंबई: सानपाडा नजीक सायन-पनवेल महामार्गावर लक्झरी बस आगीत जळून खाक, Watch Video)

या घटनेमुळे परिसरात चिंतेची लाट पसरली असून कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या संबंधित अधिक वृत्ताची प्रतीक्षा आहे.

ANI Tweet:

या घटनेची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याशी संवाद साधून तपासाचे निर्देश दिले आहेत. तसंच या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

या दुर्दैवी घटनेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. माझे दु:ख मी शब्दात व्यक्त करु शकत नाही. मी पीडित कुटुंबियांप्रती सांत्वन व्यक्त करतो. ईश्वर त्यांना या कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी बळ देवो."

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबई मधील चारकोप भागातील मंदिराला लागलेल्या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला होता. तर एकजण गंभीररित्या जखमी झाला होता. हे तिघेही रात्रीच्या वेळेस आसरा म्हणून मंदिरात झोपले होते.