बीडमध्ये 'भाजप'ला धक्का; शिवसंग्रामचा राष्ट्रवादीला पाठिंबा, विनायक मेटेंची आमदारकी काढून घेण्याची मागणी
पंकजा मुंडे आणि विनायक मेटे (संग्रहित-संपादित प्रतिमा)

लोकसभा निवडणुकींच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर बीडमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे चांगलेच राजकीय हाडवैर आहे. आता भाजपचा घटकपक्ष असलेल्या शिवसंग्राम संघटनेचे (Shiv Sangram Party) आमदार विनायक मेटे यांनी पंकजा मुंडे यांना धक्का देत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. काल, गुरुवारी विनायक मेटे यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावून राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना पाठिंबा दिला आहे. देशात आणि राज्यात भाजपसोबत असणार, मात्र बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेससोबत असणार असे मेटे यांनी स्पष्ट केले आहे.

काल झालेल्या भाषणात विनायक मेटे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर चांगलीच टीका केली. मुख्यमंत्र्यांनी तीन वेळा ठरवूनही फक्त पंकजा मुंडे यांच्यामुळे आपला मंत्रिमंडळात प्रवेश होऊ शकला नाही. मुख्यमंत्र्यांनी लेखी, तोंडी आदेश देऊनही शिवसंग्राम कार्यकर्त्यांचे छावण्यांचे प्रस्ताव नाकारून दुष्काळात राजकारण केले गेले. शिवसंग्रामची माणसे फोडून राजकीय पातळीवर मला संपवण्याचा प्रयत्न केला गेला. 2014च्या निवडणुकीत माझ्या पराभवासाठी पंकजा मुंडेंनी विरोधात काम केले, अशा अनेक कारणांमुळे पंकजा मुंडे यांच्यावर नाराज असलेल्या मेटेंनी राष्ट्रवादी-कॉंग्रेसला पाठींबा जाहीर केला आहे. (हेही वाचा: धनंजय मुंडे यांनी साखर कारखान्याच्या जमिनी लुबाडल्या, त्यांच्यावर 420 चा गुन्हा दाखल; पंकजा मुंडे यांचा आरोप)

काही दिवसांपूर्वी शिवसंग्रामच्या दोन जिल्हा परिषद सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याआधीही शिवसंग्रामचे युवा प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी विनायक मेटे यांची साथ सोडून पंकजा मुंडे यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. यासर्व घडामोडींमुळे लोकसभा निवडणूक जाहीर होताच मेटे यांनी राज्यात महायुतीसोबत मात्र बीडमध्ये भाजप विरोधात अशी भूमिका घेतली होती. मात्र आता यावर भाजप पक्षाचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. विनायक मेटेंची पक्षाच्या कोटय़ातील आमदारकी काढून घ्यावी अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी केली आहे. तसेच याबाबत भाजपा प्रदेश अध्यक्ष यांना भेटून लेखी तक्रार देणार असेही पोकळे यांनी सांगितले.