लॉकडाऊन (Lockdown) काळात पोलिसांवर हल्ला (Attack On Police) करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नाशिक-जळगाव जिल्हाच्या सीमेवर नांदगाव-चाळीसगाव रोडवर असलेल्या आमोदे फाटा चेकपोस्टवर बंदोबस्तास असलेल्या पोलीस पथकावर काही अज्ञात गावगुंडांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या हल्ल्यात पोलीस शिपाई प्रदीप बागुल यांच्या डोळ्याला इजा झाली असून अनिल शेरेकर या पोलीस कर्मचाऱ्याची वर्दी फाडण्यात आली आहे. या प्रकरणी नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर देशात तसेच राज्यात लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. मात्र, नागरिकांकडून वारंवार नियमांचे उल्लंघन करण्यात येत आहे. सध्या नागरिकांना जिल्हा बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान रविवारी नाशिक आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या अमोदे फाट्यावर नांदगाव पोलिसांकडून चेक पोस्ट तयार करण्यात आला होता. या चेक पोस्टवर नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी अनिल शेरेकर आणि प्रदीप बागुल आपली ड्यूटी बजावत होते. यावेळी दुपारच्या सुमारास जळगाव जिल्यातील सायगाव बागळीकडून एका मागोमाग तीन दुचाकी आल्या. त्यामुळे पोलिसांनी त्यांना चेक पोस्टवर विचारपूस करण्याकरिता अडवले. (हेही वाचा - कोरोनाच्या संकटात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या बेस्टच्या 70 कर्मचाऱ्यांची COVID19 चाचणी पॉझिटिव्ह)
दरम्यान, यावेळी या दुचाकी स्वारांकडे कोणत्याही प्रकारचा पास किंवा नाशिक जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी कोणताही वैद्यकीय परवाना नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्यांना परत पाठवले. हे पाहून या दुचाकीस्वाराचा पाठीमागे असलेल्या इतर दोन मोटरसायकली आलेल्या दिशेने निघुन गेल्या होत्या. परंतु, सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सायगाव तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथून वीस ते पंचवीस अनोळखी व्यक्तींनी चेक पोस्टच्या दिशेने येऊन कर्तव्य बजाबत असणाऱ्या पोलिसांवर हल्ला केला. याप्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.