कोरोनाच्या संकटात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या बेस्टच्या 70 कर्मचाऱ्यांची COVID19 चाचणी पॉझिटिव्ह
Coronavirus Outbreak | Representational Image | (Photo Credits: IANS)

देशभरासह महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातच थांबून कोरोनाच्या विरोधात लढा द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. परंतु लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवासुविधा सुरु ठेवण्यात आल्या आहेत.याच दरम्यान, अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या 70 बेस्ट  (BEST) कर्मचाऱ्यांची कोविड19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. राज्य सरकारकडून सुद्धा कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडून कोरोनाग्रस्त रुग्णांवर अहोरात्र उपचार केले जात आहेत. तसेच पोलीस दलातील कर्मचारी सुद्धा रस्त्यावर गस्त घालून आपले कर्तव्य बजावत आहेत.

बेस्टच्या 70 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामधील 17 कामगारांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेत. त्याचसोबत बेस्टमधील 5 कर्मचाऱ्यांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. तसेच पोलीस दलातील सुद्धा आतापर्यंत 500 हून अधिक जणांना कोरोनाची लागण आणि सहा जणांचा मृत्यू झाला आहे.(महाराष्ट्र: लॉकडाउनमुळे स्थलांतरित कामगारांचा  टॅक्सी, ऑटो रिक्षाच्या माध्यमातून मुंबई ते उत्तर प्रदेश प्रवास)

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजारांच्या पार गेल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्याची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोननुसार विभागणी केली आहे. त्यामुळे विविध जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता लॉकडाउनचे नियम शिथील करण्यात आले आहेत. तसेच 10 ते 17 मे पर्यंत लॉकडाउनचे नियम अधिक कठोर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.