Bank Fraud:  विदर्भ कोकण ग्रामीण बँक वेलदूर शाखेची 14 लाख रुपयांची फसवणूक, खोटे दागिने ठेवले गहाण
Vidharbha Konkan Gramin Bank | (File Image)

आर्थिक फायदा लाटण्यासाठी काही महाभागांनी चक्क बँके व्यवस्थापनाच्या डोळ्यातही धुळफेक केल्याची घटना पुढे आली आहे. ही घटना विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या ( Vidharbha Konkan Gramin Bank) वेलदूर शाखेत घडली. बँक व्यवस्थापक मकरंद पत्की यांनी गुहागर पोलीस स्टेशन (Guhagar Police Station) मध्ये दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी बँकेची 14,63,703 रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये संजय फुणगूसकर याचेही नाव आहे. त्याच्यावर याच बँकेच्या व्यवस्थापिका सुनेद्रा दुर्गोली यांच्या हत्येचा संशय आहे. सध्या तो कोठडीत आहे.

प्राप्त माहितीनुसार काही लोकांनी बँकेकडे सोने गाहण ठेवले. हे सोने खर असल्याचे मुल्यांकन फुणगूसकर याने केले. प्रत्यक्षात मात्र हे दागिने खोटे होते. या प्रकरणी बँक व्यवस्थापकांनी गुहागर पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सोने गहाण ठेवण्यासाठी आलेल्या 8 जणांनी संजय श्रीधर फुणगूसकर (रा. नवानगर) याच्याशी पूर्वसंगनमत केले. त्यातून फुणगूसकर याने नकली दागिणे खरे असल्याचे मुल्यांकन केले. श्रीमती विनया वसंत दाभोळकर (रा. वेलदूर), राजेश गोपीनाथ भोसले (रा. खालचापाट), विक्रांत महादेव दाभोळकर (रा. वेलदूर), शबीया उमरखान परबुलकर (रा. नवानगर), श्रीमती सुलोचना दत्ताराम पावसकर (रा. नवानगर), गणेश शंकर कोळथरकर (रा. नवानगर), मनोहर महादेव घुमे (रा. असगोली), मिलिंद मदन जाधव (रा. तरीबंदर) यांच्या विरोधात तक्रार नोंदविण्यात आली आहे. (हेही वाचा, Shivajirao Bhosale Co-operative Bank Scam: शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत आणखी 81 कोटी 50 लाखांचा गैरव्यवहार उघड; एकूण 153.50 लाखांचा आर्थिक घोटाळा)

तक्रारीत पुढे म्हटले आहे की, संजय श्रीधर फुणगूसकर (रा. नवानगर) यांनी आरोपींसोबत संगणमत केले आणि नकली दागिने खरे असल्याचे सांगून मुल्यांकन दाखले तयार केले. केवळ स्वात:च्या आर्थिक फायद्यासाठी नकली दागिने सोन्याचे असल्याचे भासवत बँकेची फसवणूक केली. या प्रकारामुळे विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेच्या वेलदूर शाखेेचे 5 जुलै 2019 ते 17 जुलै 2020 या काळात तब्बल 14,63,703 रुपये 10 पैसे इतक्या मोठ्या रकमेचे नुकसान झाले आहे. दरम्यान, बँक व्यवस्थापकांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.