पुण्यातील (Pune) मुख्यालय असलेल्या शिवाजीराव भोसले सहकारी बँक लिमिटेडच्या (Shivajirao Bhosale Co-operative Bank) कामकाजात गंभीर अनियमितता उघडकीस आली होती. त्यानंतर सरकारकडून झालेल्या चौकशीत या बँकेत 71 कोटींचा आर्थिक घोटाळा झाला असल्याचे दिसून आले होते. आता या बँकेत आणखी 81 कोटी 50 लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. अशाप्रकारे या बँकेत आतापर्यंत 153.50 लाखांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे.
6 मे रोजी आरबीआयने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार शिवाजीराव भोसले बँकेवरील 4 मे 2019 पासून निर्बंध लागू आहेत. मात्र त्यानंतरही बँकेतून 2 कोटी 17 लाख रुपये काढले गेले आहेत.
या प्रकरणी याआधीच बॅंकेचे संचालक व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विधानपरिषदेमधील आमदार अनिल भोसले (MLA Anil Bhosale) यांसह 4 जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांना 6 मार्च पर्यंत पोलीस कोठडीचा आदेश देण्यात आला आहे. याबाबत आणखी एका संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यापूर्वी याप्रकरणी 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश लकडे यांनी याबाबत पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली होती, त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. (हेही वाचा: राष्ट्रवादी आमदार अनिल भोसले आणि पत्नीच्या विरोधात बँक घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल)
आरबीआयने पुढील आदेश येईपर्यंत बँकेतून पैसे काढणे, ठेवी, कर्ज, गुंतवणूक किंवा इतर कोणत्याही प्रकारचा व्यवहार करण्यास मनाई केली होती. आरबीआयने म्हटले होते की, बँकेची आर्थिक परिस्थिती बळकट होईपर्यंत हे निर्बंध लागू केले जातील. यादरम्यान बँकेतून फक्त 1 हजार रुपये काढण्यास परवानगी होती. असे असताना बँकेतून 2 कोटी 17 लाख रुपये काढले गेल आहेत. याबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार आहे. पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी याबाबत माहिती दिली.