भारत निवडणूक आयोगाने (Election Commission) महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून रिक्त होणाऱ्या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार संबंधित जिल्हे/विभागामध्ये तत्काळ प्रभावाने आदर्श आचार संहिता लागू करण्यात आलेली आहे. सोबतच आयोगाने नमूद केल्याप्रमाणे कोविड-19 संदर्भातील विस्तृत मार्गदर्शक तत्वे तसेच यासंदर्भात दिनांक 28 सप्टेंबर 2021 रोजीच्या मार्गदर्शक सूचनांमधील परिच्छेद क्र.6 येथे नमूद केलेल्या सूचनांचे निवडणूक प्रक्रियेत भाग घेणाऱ्या व्यक्तींनी पालन करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेले 6 सदस्य सर्वश्री रामदास गंगाराम कदम (मुंबई मतदारसंघ), अशोक अर्जुनराव उर्फ भाई जगताप (मुंबई), सतेज उर्फ बंटी पाटील (कोल्हापूर), अमरीशभाई रसिकलाल पटेल (धुळे तथा नंदूरबार), गोपीकिसन राधाकिसन बाजोरिया (अकोला तथा बुलढाणा तथा वाशिम) आणि गिरीषचंद्र बच्छराज व्यास (नागपूर मतदारसंघ) यांची दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी सदस्यत्वाची मुदत समाप्त होत आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. (हेही वाचा: BMC Recruitment 2021: Junior Consultants Anesthetist पदासाठी नोकरभरती जाहीर; 26 नोव्हेंबर पर्यंत करा अर्ज)
निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक – 16 नोव्हेंबर 2021 (मंगळवार)
नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक – 23 नोव्हेंबर 2021 (मंगळवार)
नामनिर्देशन पत्रांची छाननी – 24 नोव्हेंबर 2021 (बुधवार)
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 26 नोव्हेंबर 2021 (शुक्रवार)
मतदानाचा दिनांक – 10 डिसेंबर 2021 (शुक्रवार)
मतदानाची वेळ – सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत
मतमोजणीचा दिनांक – 14 डिसेंबर 2021 (मंगळवार)
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक – 16 डिसेंबर 2021 (गुरूवार)
भारत निवडणूक आयोगाने मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांना उपरोक्त निवडणुकीसाठी कोविड-19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने निवडणुकीचे संचलन तसेच आवश्यक ती व्यवस्था करण्यासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचे निर्देश दिलेले आहेत, असे उप सचिव व सहमुख्य निवडणूक अधिकारी अ.ना.वळवी यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.