Vasant More Joins Shiv Sena (UBT) | (Photo Credit - X)

पुणे येथील फायरब्रँड राजकीय नेते वसंत मोरे (Vasant More Joins Shiv Sena (UBT)) यांचा शिवसेना (UBT) पक्षात प्रवेश झाला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत त्यांचे निवासस्थान 'मातोश्री' येथे हा पक्षप्रवेश पार पडला. या वेळी खासदार संजय राऊत, आमदार सचिन अहीर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. मोरे यांनी असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या उपस्थिती शिवबंधन बांधले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी मोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना शिक्षा सुनावली. त्यामुळे मातोश्री येथील हा पक्षप्रवेश वेगळ्याच अर्थाने चर्चेत आला.

वसंत मोरे आणि समर्थकांना कोणती शिक्षा?

शिवसेना (UBT) पक्षात प्रवेश केल्यानंर प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मोरे यांना शिक्षा सुनावताना म्हटले, तुम्ही सगळे त्या वेळी शिवसेना सोडून गेलात. मी लगेच तुम्हाला पक्ष सोडला वगैरे म्हणणार नाही. पण, तुम्ही इतर पक्षांमध्ये गेला, तिथे पक्षात काय वागणूक मिळते, कसा व्यवहार होते हा अनुभव घेऊन अधिक परिपक्व होऊन तुम्ही परतले आहात. त्यामुळे तुम्ही अधिक जबाबदार झाला आहात. पण, असे असले तरी, पक्ष सोडण्याची शिक्षा वसंत मोरे आणि त्यांच्या समर्थकांना व्हायला हवी. ठाकरे यांनी हवी की नको असे पुन्हा विचारले. त्या वेळी उपस्थितांनी हो, असे उत्तर दिले. मग, ठाकरे म्हणाले, शिक्षा हा तसा नकारात्मक आणि वेगळा शब्द आहे. पण तुम्ही सकारात्मक अर्थाने घ्या. तुम्हाला शिक्षा हीच की, यापुढे पुणे जिल्ह्यात शिवसेना पहिल्या पेक्षा अधिक ताकतीने सक्षम करा. लवकरच मी शिवसेना मेळाव्यासाठी पुण्याला येईन. हीच आपल्यासाठी शिक्षा असेल, असे म्हणतात उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. (हेही वाचा, Vasant More यांनी घेतली 'मातोश्री' वर उद्धव ठाकरे यांची भेट; 'वंचित' ची साथ सोडून आता हाती शिवबंधन बांधणार!)

व्हिडिओ

मी स्वगृही परतलो- मोरे

पक्षप्रवेशावेळी बोलताना वसंत मोरे काहीसे भावूक झाले. ते म्हणाले, मी 1993 मध्ये बारावी पास झालो आणि त्याच वेळी शिवसेना शाखाध्यक्षही झालो. तेव्हापासून मी राजकारणात आहे. अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. वेगवेगळ्या पक्षात गेलो. पण आता मी मूळ पक्षात परतलो आहे. हा पक्षप्रवेश आहे वगैरे असे अनेक लोक म्हणतात. पण, मी तसे मानत नाही. मी स्वगृही परतलो आहे, असेच मानेन, असे वसंत मोरे म्हणाले. (हेही वाचा, Uddhav Thackeray on Rahul Gandhi's speech: उद्धव ठाकरे यांच्याकडून राहुल गांधी यांचे समर्थन; भाजपच्या हिंदुत्त्वावर प्रश्नचिन्ह (Watch Video))

दरम्यान, वसंत मोरे यांच्या पक्षप्रवेशाची पाठिमागील अनेक दिवसांपासून चर्चा होती. हा प्रवेश लोकसभा निवडणुकीवेळीच होणार होता. मात्र, मोरे यांना अचानक वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेची उमेदवारी मिळाली. त्यामुळे हा प्रवेश लांबल्याचे सांगितले जात होते.