Urmila Matondkar To Join Shiv Sena: अभिनेत्री उर्मिला मातोंडकर पुन्हा राजकारणात सक्रीय होणार; उद्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता
Urmila Matondkar's speech on CAA. (Photo Credits: ANI)

बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) या पुन्हा राजकारणात सक्रिय होणार आहेत. त्यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या सदस्यात्वाचा राजीनामा दिला होता. परंतु आता त्या आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात शिवसेनेपासून (Shiv Sena) करणार आहेत. उर्मिला मातोंडकर यांनी काही दिवसांपूर्वी विधानपरिषदेतील राज्यपाल नामनिर्देशित जागेसंदर्भात शिवसेनेच्या प्रस्तावाला होकार दिल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता त्या थेट शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार 12 नावांची यादी बंद पाकिटात राज्यपालांना सादर करण्यात आली. यांपैकी एका जागेसाठी शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून उर्मिला मातोंडकर यांची निवड करण्यात आल्याचे समोर आले होते. मुंबई काँग्रेसच्या भल्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी अंतर्गत राजकारण सोडवण्यासाठी काँग्रेसने माझ्या प्रतिमेचा गैरवापर करुन घेतला, असा दावा करत उर्मिला मातोंडकर यांनी अवघ्या सहा महिन्यात काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. हे देखील वाचा- Udayanraje Bhosale on Maratha Reservation: देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सत्ता द्या, मी आरक्षण मिळवून देतो; उदयनराजे भोसले यांची राज्य सरकारवर टीका

राज्यपालांकडे सादर करण्यात आलेल्या यादीत काँग्रेसकडून सचिन सावंत, रजनी पाटील, मुजफ्फर हुसैन, अनिरुद्ध वणगे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे, आनंद शिंदे आणि शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर, चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावांची शिफारस करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.