Navi Mumbai Latest News: नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) उरण परिसरात जोरदार कारवाई सुरु केली आहे. रक्कम गुंतवून अल्पावधीतच दुप्पट किंवा त्याहून अधिक परतावा मिळविण्याचे आमिष दाखवून काही आरोपींनी जवळपास 300 ते 400 कोटींचा घपला केल्याचा संशय आहे. नागरिकांकडून फसवणुकीच्या तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी कारवाईस सुरुवात केली असून येथील दोन रहिवाशांना या प्रकरणात अटक केली आहे. फसवणूक झालेल्या नागरिकांची संख्या जवळपास 2000 च्या आसपास पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी पॉन्झी स्कीम (Uran Ponzi Scam) चालवत असत. तसेच, ते स्थानिक ग्रामस्थांना गुंतवलेली रक्कम 50 आणि 30 दिवसांत दुप्पट गुंतवणूक करण्याचे आश्वासन देत असत. त्यांच्या भूलथापा आणि आमिषाला बळी पडून अनेक नागरिक फसल्याची चर्चा आहे.
आरोपी प्रदीर्घ काळापासून नागरिकांना फसवत आल्याने घोटाळ्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर वाढण्याची चिन्हे आहेत. पोलिसांची आर्थिक गुन्हे अन्वेशन शाखा त्याचाच तपास करत आहेत. मीड डे डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणात काही सरकारी अधिकारी आणि कर्मचारीही गुंतल्याची चर्चा आहे. दुसऱ्या बाजूला तक्रारदारांची संख्या जवळपास 100 च्या आसपास पोहोचली आहे. पण, अद्यापही काही लोक 'झाकली मुठ सव्वा लाखाची' म्हणून गप्प बसले आहेत. कारण त्यांना भीती आहे की, जर आपण तक्रार केली तर आयकर विभागाचाच ससेमीरा आपल्या पाठी लागू शकतो. त्यामुळे अनेक लोक तक्रार करणे टाळत असल्याची दबकी चर्चा आहे.
मजेशीर असे की, या प्रकरणाची स्थानिक पोलिसांना कल्पना होती किंवा नाही याची पुष्टी होऊ शकली नाही. मात्र, पोलिसांना नाकाबंदी दरम्यान या प्रकरणाचा योगायोगानेच शोध लागला. पोलिसांनी नेहमीप्रमाणे नाकाबंदी केली होती. या वेळी त्यांना एका कारमध्ये तब्बल 10 कोटी रुपये आढळून आले. पोलिसांनी तातडीने या प्रकरणाची माहिती आयकर विभाग आणि संबंधित अधिकाऱ्याला दिली. त्यानंतर केलेल्या चौकशीत उरणमधील या फसवणुकीबाबत पोलिसांना माहिती मिळाली.
स्थानिक पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. वरिष्ठ पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. हे प्रकरण नवी मुंबई EOW कडे वर्ग करण्यात आले असल्याचे समजते.