Rain | Representative image (Photo Credit- Pixabay)

गेल्या दहा दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाने (Unseasonal Rains) थैमान घातले आहे. आतापर्यंत पावसामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी सात जणांचा मृत्यू वीज पडून झाला आहे. मृतांच्या वारसांना सरकारी मदत देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राज्य सरकारला प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. या 12 जणांपैकी सर्वाधिक बळींची संख्या नाशिक जिल्ह्यात नोंदवली गेली आहे. या ठिकाणी 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

नाशिक महसूल विभागात नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार हे पाच जिल्हे समाविष्ट आहेत. गेल्या दीड आठवड्यात यापैकी बहुतेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. जोरदार वारे, मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यात द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचा अंतिम अहवाल अद्याप मिळालेला नाही. पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असले तरी, काही नागरिकांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या पावसामुळे पाच जिल्ह्यांमध्ये एकूण 12 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी झाडे पडल्याने, घराचे छत कोसळल्याने आणि वीज कोसळल्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक आणि नंदुरबारमध्ये प्रत्येकी दोघांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. याशिवाय अहिल्यानगरमध्ये तीन, नंदुरबारमध्ये दोन आणि जळगाव आणि धुळे जिल्ह्यात प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मृतांव्यतिरिक्त, अनेक लोक जखमी झाले आहेत. वीज पडल्याने पशुधनाचे नुकसान झाले आहे, तर घरे, गोठ्या, कुक्कुटपालन आणि इतर मालमत्तांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (हेही वाचा: Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक)

महसूल विभागाने मृतांच्या वारसांना मदत देण्यासाठी नियमांनुसार कार्यवाही सुरू केली आहे. दरम्यान, 19 मे पर्यंत नाशिकमध्ये 103.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 7 मे पासून अवकाळी पाऊस पडत आहे. 10 मे रोजी सर्वाधिक 33.8 मिमी पाऊस नोंदवला गेला. अरबी समुद्रामध्ये कर्नाटक किनारपट्टीजवळ गुरुवारी, 22 मे रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. या प्रभावामुळे राज्यातआज, 19 मे पासून मुसळधार पावसाची शक्यता आहे.