शिवसेना (Shiv Sena) आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांना अंडरवर्ल्ड (Underworld) कडून धमकीचा कॉल आल्याचे वृत्त आहे. धमकी देणाऱ्या आरोपीने त्याची ओळख अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन (Chhota Rajan) याचा पुतण्या असल्याचा दावा केला आहे. या कॉलनंतर आमदार कांदे यांनी नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्याकडे तक्रार दिली आहे. आमदार सुहास कांदे हे शिवसेना पक्षाकडून विधानसभा निवडणूक 2019 मध्ये नांदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडूण आले आहेत.
आमदार सुहास कांदे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, फोनवरील व्यक्तीने धमकी देताना आपण अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याचा पुतण्या अक्षय निकाळजे असल्याचे सांगितले. निकाळजी याने धमकी देत सांगितले की, सुहास कांदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली डीपीडीसीच्या निधी वाटपासंदर्भातील रिट याचिका मागे घ्यावी. ही याचिका मागे घ्या अन्यथा तम्ही आणि तुमच्या कुटुंबीयांसाठी ही गोष्ट बर राहणार नाही. (हेही वाचा, उद्धव ठाकरे यांनी सरकारमध्ये घेतल्यने मेलेले काँग्रेसवाले जिवंत झाले- शिवसेना समर्थक आमदार)
आमदार सुहास कांदे यांना मिळालेल्या कथीत धमकीची नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी तत्काळ दखल घेतली आहे. त्यांंनी धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन संबंधितावर तत्काळ कारवाई करण्यात यावी असे आदेश भुजबळ यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहेत. कांदे यांना आलेल्या धमकीबद्दल राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरु असतानाच छगन भुजबळ यांना माहिती मिळाली. छगन भुजबळ यांनी आपण या घटनेबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना माहिती दिल्याचे सांगितले.
दरम्यान, छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यात नुकताच एका बैठकीत जाहीर वाद झाल्याचे पुढे आले होते. पूरग्रस्तांना वाटण्यात येणाऱ्या मदतीवरुन आमदार कांदे आणि छगन भुजबळ यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. प्रसारमाध्यमांतूनही या खडाजंगीचे व्हिडिओ झळकले होते.