उद्धव ठाकरे यांनी सरकारमध्ये घेतल्यने मेलेले काँग्रेसवाले जिवंत झाले- शिवसेना समर्थक आमदार
Ashish Jaiswal | (Photo Credits: Facebook)

शिवसेना (Shiv Sena) आमदार आशीष जयस्वाल (Ashish Jaiswal) हे काँग्रेसबाबत (Congress) केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन चर्चेत आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सरकारमध्ये समावेश करुन घेतला आणि मेलेले काँग्रेसवाले जिवंत झाले, असे विधान करुन आशीष जयस्वाल यांनी खळबळ उडवून दिली आहे. जयस्वाल यांच्या दोन्ही विधानांतून दोन्ही काँग्रेसला डिवचले गेले आहे. त्यामुळे महाविकासआघाडी सरकारमध्ये धुसफूस वाढण्याची शक्यता आहे. नागपूर येथे जिल्हा परिषद पोटनिवडणूक प्रचारादरम्यान आशीष जयस्वाल बोलत होते. (हेही वाचा, PMC Election 2022: पुण्याचा आगामी महापौर शिवसेनेचाच झाला पाहिजे, संजय राऊत यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना)

काय म्हणाले आशीष जयस्वाल?

'अरे.. हे काँग्रेसचे लोक मेले होते. त्यांना कोणी कुत्रंही विचारत नव्हतं. हे लोक सुटकेस भरुन दुसऱ्या पक्षात जायला तयार होते. दररोज एकजण पक्ष सोडत होता. यांना अशी गळती लागली होती की यांचे हाल कुत्रंही खात नव्हते. पण, उद्धव ठाकरे यांनी या लोकांना सरकारमध्ये घेतले आणि हे काँग्रेसचे मेलेले लोक जिवंत झाले. हे मी काही चोरुन बोलत नाही. उघडपणे बोलतो आहे', असे जयस्वाल म्हणाले. आशीष जयस्वाल हे रामटेक- नागपूर मतदारसंघाचे आमदार आहेत. ते शिवसेना समर्थक आमदार आहेत. विधानसभा निवडणूक 2019 मध्ये ते अपक्ष म्हणून निवडूण आले आहेत.

दरम्यान, आमदार आशीष जयस्वाल यांच्या विधानावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार सत्तेत आहे. त्यामुळे सत्तेत असलेल्या आमदारांनी सहकारी पक्षाबद्दल विचारपूर्वक बोलावे. काँग्रेस हा एक विचार आहे. हा विचार संपूर्ण देशाने स्वीकारला आहे. त्यामुळे काँग्रेस विचार कधीही मेला नव्हता कधीही मरणार नाही. त्यामुळे काँग्रेसबाबत बोलताना सहकारी पक्षाच्या आमदारांनी विचार करावा. तसेच, अशी विधाने कोणी केली तर त्याला महत्त्व देण्याचे कारण नाही. महाविकासआघाडीतील पक्षाचे प्रमुख नेते अथवा प्रवक्ते बोलले तर त्याबाबत विचार करणे अथवा त्या विधानाला महत्त्व दिलेले योग्य राहील, असेही सावंत म्हणाले.