पुण्यातील बंड गार्डन परिसरात घोडागाडीवर मालकाने फिल्मी स्टाईलने मिळवले नियंत्रण; पाहा व्हिडिओ
घोडागाडीवर नियंत्रण मिळवताना अपघात (फोटो क्रेडिट्स: ANI)

पुण्यातील बंड गार्डन पुलावर मध्यरात्री उधळलेल्या घोड्याची बग्गी नियंत्रित करण्याच्या प्रयत्नात अपघात झाला. या अपघातात घोडागाडीचा मालक जखमी झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पुणे शहरातील बंड गार्डपासून घोडागाडी मालकांचे बग्गीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दोन्ही घोडे वेगाने धावत सुटले. परंतु, घोडेमालकाने अगदी फिल्मी स्टाईलने घोड्यावर नियंत्रण मिळवले.

ही घटना कोरेगाव पार्क कल्याणीनगर रस्त्यावर मध्यरात्री घडली. दरम्यान, बग्गीला दोन घोडे जुंपलेले होते. बग्गीत कोणी नसताना अचानक घोड्यांनी धावायला सुरुवात केली. त्यामुळे घोडामालक एका दुचाकीवरून घोडागाडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जाऊ लागला. (हेही वाचा - Fact Check: 2000 हजारांच्या नोटा बंद होणार? 1 हजाराच्या नव्या नोटा चलनात येणार? जाणून घ्या काय आहे सत्य)

मालकाने बग्गीजवळ जाऊन घोड्याला थांबविण्यासाठी त्याचा लगाम पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी घोड्याचा पाय घसरल्याने तो खाली पडला. त्यामुळे दुचाकीमागे बसलेला मालकही खाली पडला व त्यांच्या अंगावरुन बग्गी गेली. या घटनेत घोडामालक जखमी झाला आहे. पंरतु, सुदैवाने मालकाचे प्राण वाचले असून सध्या त्याची प्रकृती चांगली आहे.