उल्हासनगर येथील रियल इस्टेट डेव्हलपर राम वाधवा नावाच्या व्यक्तीने चंद्रावर जमीन खरेदी केल्याची बाब तुफान व्हायरल होत आहे. ऐकून थोडे विचित्र वाटेल पण हे खरे आहे. तर दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने सुद्धा चंद्रावर जमीन खरेदी केली आहे असे कळल्यावर त्या गोष्टीपासून प्रोत्साहन घेत वाधवा यांनी सुद्धा चंद्रावर जमीन खरेदी केल्याचे म्हटले जात आहे. राम वाधवा आणि त्याने वडील नंदलाल मिळून मिलान ग्रुप नावाची एक डेव्हलपर फर्म चालवतात.(अहो आश्चर्यम ! पुण्यातील महिलेने 50 हजारात चक्क चंद्रावर घेतली एक एकर जमीन)
सुशांत सिंह राजपूत याने चंद्रावर जमीन खरेदी केल्याचे राम वाधवा याला जेव्हा कळले तेव्हाच त्याने आपण सुद्धा तसेच करायचे ठरवले. यावर त्याने सुशांत सिंह राजपूत याने खरेदी केलेल्या जमिनीचा अभ्यास सुद्धा केला. त्याचसोबत त्याची अधिक माहिती मिळवली असता अनेक जणांनी चंद्रावर जमीन खरेदी केल्याचे त्याला समजले. या सर्वांनी युएस मधील Lunar Land Records Department यांच्याकडून जमीन खरेदी केली होती.
या सर्व प्रोसेस बद्दल त्यांनी अधिक अभ्यास करत 1 एकर जमीन खरेदी केली. यासाठी त्याने महिनाभर त्या डिपार्टमेंटची माहिती मिळवली की त्यांना चंद्रावरील जमीन विक्री करण्याचा नक्की हक्क आहे की नाही. तर चंद्रावर जमीन खरेदी करणारे राम वाधवा हे देशातील चौथे खरेदीदार ठरल्याचे बोलले जात आहे.(आता Amazon सुद्धा अंतराळ मोहिमेत सामील; Jeff Bezos यांनी सादर केले चंद्रावर झेपावणारे Moon Lander)
वाधवा यांनी याबद्दल आपली प्रतिक्रिया देत असे म्हटले आहे की, भविष्याचा विचार करुन ही जमीन खरेदी केली आहे. त्याचसोबत वाधवा यांनी सरकारकडून सॅटेलाइट फोन सुद्धा खरेदी केला आहे. जो अवकाश, जंगल आणि समुद्रात सुद्धा चालू शकणार आहे. सॅटेलाइट फोनसाठी त्यांना बीएसएनएल यांना 1 लाख 70 रुपये ही दिले आहे. राम वाधवा यांनी पुढे ही म्हटले की, या फोनच्या माध्यमातून आउटगोइंग कॉलिंगसाठी प्रति मिनिटाला त्यांना 35 रुपये मोजावे लागणार आहेत.