उजनी पाणी प्रश्न (Ujani Water Issue) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. उजनीच्या पाण्यावरुन सोलापूर (Solapur ) जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. आक्रमक शेतकऱ्यांनी आंदोलन करत सोलापूल येथे जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil ) यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले आहे. दुसऱ्या बाजूला शेतकरी आक्रमक झाल्याने बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गोविंदबाग या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या उजनी जलाशयातून पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील 22 गावांना पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानंतर सोलापूरात शेतकरी आक्रमक झाले आहेत.
उजनी धरणातून इंदापूर तालुक्यातील 22 गावांना पाच टीएमसी इतके पाणी देण्यात येणार होते. परंतू, या निर्णयास विविध स्तरातून विरोध होत असल्याचे लक्षात येताच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी हा निर्णय मागे घेत असल्याचे सांगितले. यावर समाधान न झाल्याने सोलापूर येथील शेतकऱ्यांनी 'आम्हाला तोंडी अश्वासन नको, लेखी द्या. शासनदरबारी तसा अध्यादेश' काढा अशी मागणी केली. ही मागणी पूर्ण व्हावी यासाठी जनहित शेतकरी संघटनेने मंत्री जयंत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
उजनीच्या पाणी प्रश्नी सोलापूरातील काही शेतकरी आणि संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर सोलापूरातील काही कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केल्याचे वृत्त आहे. तसेच, एक-दोन कार्यकर्त्यांना बारामती येथून अटक करण्यात आली आहे. आमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवा, अशी या कार्यकर्त्यांची मागणी होती. या पार्श्वभूमीवर अनुचीत प्रकार टाळण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आल्याचे वृत्त आहे. (हेही वाचा, अशा पद्धतीने पाणी प्यायल्यास आरोग्यावर होऊ शकतात विपरित परिणाम)
दरम्यान, आधीही उजनी धरणाच्या पाणी प्रश्नावरुन अनेकदा संघर्ष झाला आहे. प्रामुख्याने राजकीय मंडळींनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आहेत. शिवाय सोलापूरमध्ये विधानसभा, लोकसभा आणि इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उजनी धरणाचे पाणी आणि पाणीप्रश्नाशी संबंधीत राजकारणाचा नेहमची उल्लेख होत असतो.