राज्यात पावसाने उशीराने हजेरी लावल्यामुळे सोलापूरातील उजनी धरणातही पाणीसाठा जेमतेम असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. पंरतू सध्या धरण क्षेत्रात जोरदार प्रजननवृष्टी होत असल्याने पावसामुळे धरण वेगाने भरत आहे. त्यामुळे सोलापूरकर सुखावले आहेत. गेल्या 15 दिवसांपासून चांगला पाऊस होत असल्याने उजनी धरणातील पाणीसाठ्यात थेट 20 टक्क्यांनी वाढ झाली असून आता पाणीसाठा हा 40 टक्के इतका झाला आहे. सध्या धरणात एकूण पाणीसाठा 84.23 टीएमसी तर उपयुक्त पाणीसाठा 20.51 पर्यंत वाढला होता. गेल्या तीन दिवसांत पाणीसाठा झपाट्याने वाढला असून येत्या दोन दिवसांत उपयुक्त पाणीसाठा 50 टक्के पार करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (हेही वाचा - Maharashtra Weather Update: राज्यात 4 किंवा 5 ऑक्टोबरपर्यंत मान्सून हळूहळू माघार घेणार, IMD ने वर्तवला अंदाज)
उजनी धरणाची एकूण क्षमता 123 टीएमसी एवढी आहे. धरण शंभर टक्के भरण्यासाठी आणखी 40 टीएमसी पाणीसाठ्याची गरज आहे. प्राप्त परिस्थितीत धरणातील वाढलेला पाणीसाठा पाहता धरणातून शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या धरणावर जिल्ह्यातील सुमारे दोन लाख हेक्टर क्षेत्र सिंचनासाठी अवलंबून आहे. परंतु यंदा पावसाळा संपत आला तरी धरणात पाणीसाठ्याची स्थिती दयनीय असल्यामुळे शेती संकटात आली होती. यातच सोलापूर शहरासह पंढरपूर व सांगोला शरासाठी धरणातून सुमारे पाच टीएमसी पाणी भीमा नदीवाटे सोडण्यात आल्यामुळे धरणातील पाणीसाठा आणखी खालावला होता.