खरी शिवसेना (Shiv Sena) कोणाची याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाकडे प्रलंबित असला तरी, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट हीच ‘खरी’ शिवसेना आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाने सोमवारी सांगितले. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तापसे (Mahesh Tapase) यांनी उद्धव ठाकरे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तापसे म्हणाले की, दसऱ्याच्या दिवशी दोन्ही गटांकडून दोन मेळावे घेण्यात येत आहेत. मात्र, खरी शिवसेना पक्षाचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालते, जी उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे.
यंदा महाराष्ट्रात दोन दसरा मेळावा होणार आहेत. यातील एक परंपरा, निष्ठा, स्वाभिमान आणि बाळा ठाकरेंच्या विचारांचा म्हणजेच उद्धव ठाकरेंचा मेळावा. तर दुसरा उद्धव ठाकरेंच्याविरुद्ध बंड करून वेगळा झालेल्या शिंदे गटाचा. उद्धव ठाकरे हे दसऱ्याच्या मुहूर्तावर संध्याकाळी 6.30 वाजता दादरच्या शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर दसरा मेळावा घेणार आहेत. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीएचे मैदान 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मेळाव्यासाठी बुक केले आहे.
याआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना झटका देत, सुप्रीम कोर्टाने नक्की शिवसेना कोणाची व पक्षाचे धनुष्यबाण निवडणूक चिन्ह कोणाला द्यावे याचा निर्णय निवडणूक आयोगाच्या कोर्टात दिला आहे. शिवसेनेत फूट पडल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाचे इतर प्रमुख नेते ठाकरे यांच्या गटाला पाठिंबा देत आहेत. ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना महाविकास आघाडीच्या तीन सदस्यांपैकी एक आहे. (हेही वाचा: ‘भारत जोडो’ यात्रेच्या धसक्याने BJP ला ‘सर्वधर्मसमभाव’ची आठवण'- Atul Londhe)
दरम्यान, नुकतेच शिवसेनेचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला द्यायचे का? या प्रश्नाबाबत एबीपी न्यूजचे सर्वेक्षण सी-व्होटरने एक साप्ताहिक सर्वेक्षण केले, ज्याचा धक्कादायक निकाल समोर आला आहे. शिवसेनेचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला द्यावे, असे 51 टक्के लोकांनी सांगितले, तर 49 टक्के लोकांनी ‘नाही’ असे उत्तर दिले. या सर्वेक्षणात 4,427 लोक सहभागी झाले होते.