शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नुकताच ठाणे आणि कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघांचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान, त्यांनी कल्याण, डोंबिवली, मुंब्रा आणि कळवा परिसरातील काही शिवसेना शाखांना भेट दिली. या भेटी आणि त्यानंतर काहीच दिवसांमध्ये घेतलेल्या लोकन्यायालय रुपातील महापत्रकार परिषद यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. खास करुन कळवा यथील खारीगाव शाखेवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Visits Kharegaon Shakha) यांचे समर्थक आणि सामान्य नागरिक यांची गर्दी हळूहळू वाढू लागली आहे. यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नेतृत्व पाहिलेले ज्येष्ठ शिवसैनिक आणि उद्धव ठाकरे यांनी स्वीकारलेल्या बहुजनवादी विस्तारीत हिंदुत्त्वाने भारावलेल्या तरुण शिवसैनिकांचा समावेश आहे. याशिवाय शिवसैनिक नसलेले मात्र उद्धव यांनी मुख्यमंत्री पदावर असताना कोरोनाकाळात केलेल्या कामामुळे त्यांच्याकडे आकर्शित झालेल्या नागरिकांचाही संख्या शाखेवर वाढते आहे.
तळागाळातील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबतच- संतोष कवळे
शिवसेना (UBT) खारीगांव शाखा विभाग प्रमुख संतोष कवळे उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याबात सांगतात की, ''पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कल्याण लोकसभा क्षेत्रातील मुंब्रा कळवा विभागातील खारेगाव पारसिक शाखेस सदिच्छा भेट दिली. या भेटीमुळे आम्हा तळागाळातील शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. खास करुन त्यांच्या दौऱ्यावेळी परिसरातील हजारो नागरिकांनी प्रचंड गर्दी करून शिवसेना ठाकरे यांचीच हे दाखवून दिले. साहेबांच्या दौऱ्यावेळी आणि छोटेखणी सभेवेळी परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. ज्याची उद्धव साहेबांनीही दखल घेतली. त्यांचा हा दौरा आमच्यासह शेकडो शिवसैनिकांना प्रेरणादायी ठरतो आहे. आम्ही आजही शिवसेने सोबतच आहोत. याची ग्वाही देण्यासाठी हा दौरा निमित्त ठरला. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला असून येणाऱ्या निवडणुका शिवसेना महाविकास आघाडीच्या सोबत राहून जिंकणार म्हणजे जिंकणार असे चित्र तयार झाले आहे'', असे कवळे सांगता. (हेही वाचा, Quit BJP Joined Shiv Sena (UBT): उद्धव ठाकरे यांची ताकद वाढली, भाजप आणि थेट संघालाही धक्का)
उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाचे जनतेवर गारुड- विलास खेडेकर (ज्येष्ठ शिवसैनिक)
ज्येष्ठ शिवसैनिक विलास रामचंद्र खेडेकर सांगतात ''आमची खारेगाव शाका सुरु होऊन साधारण दोन ते अडिच महिने झाले. तशी ही शाखा नवी आहे. आम्ही शाखेवर जमू लागलो. त्यानंतर काहीच दिवसात आम्हास दस्तुरखूद्द शिवसेन (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच दौरा मतदारसंघात असल्याचा आदेश वरिष्ठांकडून आला. आमच्यासाठी ही कसोटी होती. दौऱ्याची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ नव्हता. कारण दौऱ्याच्या अवघे चार दिवस आगोदर आम्हाला याबाबत माहिती मिळाली होती. आम्हा जुन्याजाणत्या शिवसैनिकांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या. आम्ही जोरदार तयारीला लागलो. सध्याचे वातावरण आणि साहेबांच्या शिवसेनेशी झालेला द्रोह पाहता आमच्यासाठी साहेबांचा दौरा आव्हान होते. त्यात आमच्याकडे एकही नगरसेवक नव्हता. पण, उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाचे जनमानसावर असलेले गारुडच इतके जबरदस्त की, नागरिकांनी या दौऱ्यात स्वत:हून उत्स्फूर्थ हजेरी लावली. त्यामुळे पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह गेले असले तरी मूळ संघटना आणि आमच्यासारखा शिवसैनिक ठाकरेंसोबतच असल्याची ग्वाही मिळाली. या दौऱ्यामुळे नागरिकांनाही संदेश मिळाला असून सामान्य नागरिक आणि तरुण शिवसैनिकही शाखेवर हजेरी लावू लागले आहे. शाखेमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढते आहे, असे ज्येष्ठ शिवसैनिक विलास रामचंद्र खेडेकर सांगतात. (हेही वाचा, Uddhav Thackeray On Dynastic Politics: घरंदाज माणसानेच घराणेशाही विषयावर बोलावे; उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदी यांना टोला)
महापत्रकार परिषदेने दाखवले सत्य- एच आर भोर (ज्येष्ठ शिवसैनिक)
उद्धव ठाकरे यांचा दौरा सामन्य शिवसैनिकांसाठी उर्जास्त्रोत ठरतो आहे. पण, त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये त्यांनी भरवलेले लोकन्यायालय रुपातील महापत्रकार परिषद सामान्य नागरिक आणि देशाच्या वाटचालीसाठी महत्त्वाचे आहे. या पत्रकार परिषदेच्या रुपात खरे वास्तव लोकांच्या समोर आले. आता सत्ताधाऱ्यांकडून निकालाच्या प्रती आणि कागदी घोडे कितीही नाचवले गेले तरी सत्य लोकांच्या समोर आल आहे. यामुळे तळागाळातील मतदार आणि शिवसैनिक यांच्या मनातील संभ्रम दूर होण्यास मदत होईल, असे ज्येष्ठ शिवसैनिक एच आर भोर सांगतात. (हेही वाचा, Saamana Attacks On Bjp: 'नार्वेकरांनी भाजपच्या टेस्ट ट्यूब बेबीचं रूपांतर खऱ्या शिवसेनेत केलं'; UBT मुखपत्र 'सामना'तून भाजपवर टीकास्त्र)
'साहेबांना आता खरी आमची गरज आहे'
दरम्यान, शिवसेना शाखेवरील उपस्थितांमध्ये ज्येष्ठ आणि जुन्या जाणत्या शिवसैनिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला तरुण शिवसैनिक प्रामुख्याने नोकरी आणि कामधंद्यास असल्याने हा शिवसैनिक शनिवार, रविवार आणि सुट्टीचे दिवस तसेच, पक्षाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांना, बैठकींना हजेरी लावतो. यातील एका तरुण शिवसैनिकांना आपणास शाखेवर यावेसे का वाटते असे विचारले असता, डोळ्या पाणी आणून तो उद्गारतो 'साहेबांना आता खरी आमची गरज आहे'.