फेसबूक लाईव्ह दरम्यान माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केल्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या मॉरिसनेही (Mauris Noronha) स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेवरून पुन्हा राज्यात कायदा आणि सुवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत का? अशी चर्चा होत असताना आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणी नवा संशय व्यक्त केला आहे. पूर्वी दोन गटांमध्ये असणारं गॅंगवॉर आता सरकार मध्ये आलं आहे अशी टीपण्णी करताना अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस यांंचं हत्याकांड 'सुपारी' देऊनही घडवलं गेलं आहे का? याचीही चौकशी करावी असं म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी काल अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतल्यानंतर पोलिसांशीही चर्चा केली होती. 'अभिषेकवर गोळ्या चालवल्याचा आवाज येत आहे, फूटेज दिसत आहे पण ते मॉरिसनेच केलं आहे का? हे दिसत नाही. तसेच हे सूडभावनेतून झालं असेल तर मॉरिसने अभिषेकच्या हत्येनंतर स्वतः आत्महत्या का केली? त्याचं फूटेज आहे का? असे सवाल उपस्थित केले आहेत. हे प्रकरण जेवढं सोप्प वाटतय तेवढं सोप्प नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणामध्ये त्यांनी पोलिसांना मोकळीक द्यावी आणि पोलिसांनी स्थिती हातात घेऊन प्रकरणाचा छडा लावावा अशी प्रतिक्रिया दिली आहे. VIDEO- Abhishek Ghosalkar Shot Dead: शिवसेना यूबीटी नेते अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या; नंतर आरोपी मॉरिस भाईने स्वतःलाही संपवले (Watch) .
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र
राज्यात मागील काही दिवसांमध्ये गोळीबार, हत्या आणि कायदा सुवस्था बिघडल्याच्या अनेक घटना समोर आल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. आज टीका करताना उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्र्यांवर बोचरी टीका करताना 'गृहमंत्री मनोरूग्ण आहेत का?' असा सवाल करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
सरकार बरखास्त करत राष्ट्रपती राजवटीची मागणी
राज्यात सुरू असलेली बेबंदशाही पाहता आता सरकारने आणि प्रामुख्याने गृहमंत्र्यांनी राजीनामा देणं अपेक्षित असते. पण इथे मुख्यमंत्रीच गुंडाना आश्रय देत असल्याची स्थिती असताना सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करत आहोत. तसेच तातडीने निवडणूका घेण्याची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालय आम्हांला सध्या शेवटची आशा दिसत असल्याचंही ते म्हणाले आहेत.
सध्या मॉरिसचा पीए, बॉडीगार्ड मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत. मॉरिसच्या सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीमधून गोळ्या झाडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्याचं लायसंस यूपी पोलिसांकडून देण्यात आलं आहे. सध्या मॉरिसच्या निकटवर्तीयांची चौकशी सुरू आहे.