'धारावी बचाव' मोर्चा (Dharavi Bachav Morcha), दिशा सॅलियन मृत्यू (Disha Salian Death Case) प्रकरणी एसआयटी चौकशी, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावरील आरोप आणि सलीम कुत्ता पार्टी यांसह राज्य विधिमंडळ अधिवेशनात गाजलेल्या विविध मुद्द्यांवरुन शिवसेना (UBT) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे. नागपूर येथे राज्य विधीमंडळाबाहेरुन ते बोलत होते. या वेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा नामोल्लेख टाळत जोरदार टोला लगावला तसेच, आदित्य यांच्याबद्दल दाखविलेल्या विश्वासाबद्दल शर्मिला ठाकरे यांचे आभारही मानले. प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे हे काहीसे आक्रमक पाहायला मिळाले.
'प्रश्न आदानीला उत्तर चमच्यांकडून'
'धारावी बचाव' मोर्चा हा धारावीतील नागरिकांसाठी आणि धारावीच्या विकासासाठी होता. या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही आदानीला प्रश्न विचारले होते. पण, या प्रश्नांची उत्तरे आदानींकडून येण्याऐवजी भाजप आणि इतर चमच्यांकडूनच येत आहेत. आम्हाला हे कळतच नाही की, आदानीला प्रश्न विचारला की चमचे का इतके वाजतात, असे उद्धव ठाकरे म्हणाले. (हेही वाचा, मुंबईतील मोठा प्रकल्प Adani Group कडेच का? Raj Thackeray यांचा सवाल; 'मविआ'च्या मोर्चा वर टीपण्णी)
'शालीचे वजन पेलतंय का?'
धारावीच्या मुद्द्यावर महाविकासआघाडीला इतक्या उशीरा जाग का आली, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. याबाबत प्रसारमाध्यमांनी विचारले असता अर्धवट माहितीवर प्रश्न विचारणाऱ्यांच्या प्रश्नांना मी उत्तर देत नाही. इतरांना प्रश्न विचारण्याआगोदर त्या शालीचे वजन पेलतंय का? याबाबत हे त्यांनी आगोदर पाहावे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
'मोदींनी चंद्रावरुन वाहतूक सुरु केली'
धारावीतील मोर्चामध्ये मुंबई आणि धारावी बाहेरील लोक होते, असा दावा सत्ताधारी आणि भाजपकडून केला गेला. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी मिष्कील भाष्य करत म्हटले की, होय, ही सर्व माणसे मुंबईतील नव्हती. ती सर्व चंद्रावरुन आली होती. चांद्रयान मोहीम यशस्वी केल्यापासून मोदींनी चंद्रावरुन वाहतूक सुरु केली आहे. त्यामुळे चंद्रावरुन वाहतूक करत ही माणसे पृथ्वीवर आली होती आणि धारावीत मोर्चा काढून धारावीच्या प्रश्नांबाबत बोलत होती.
व्हिडिओ
महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशन २०२३ | पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांचा प्रसारमाध्यमांशी संवाद | ?विधानभवन नागपूर - #LIVE https://t.co/pPs3pRbCqt
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) December 18, 2023
शर्मिला ठाकरे यांचे आभार
दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले जात आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक एसआयटीही स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान, याबाबत प्रसारमाध्यमांनी विचारले असता शर्मिला ठाकरे यांनी 'आदित्य असे काही करणार नाही', असे उद्गार काढले आहेत. याबाबत प्रतिक्रिया विचारली असता 'त्यांचे मनापासून आभार', असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, राज्य सरकारवरील टीकेची धार वाढवताना या आधी असे उगडानागडा कारभार करणारे राज्य सरकार केव्हाही पाहिले नव्हते. या राज्य सरकारला कोणताही धारबंध उरला नाही,असेही उद्धव ठाकरे म्हणाले.