उद्धव ठाकरे केवळ 'नामधारी मुख्यमंत्री', त्यांना बारामतीवरुन आदेश द्यावा लागतो - नारायण राणे
(Photo Credit- PTI)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे केवळ 'नामधारी मुख्यमंत्री' आहेत. त्यांना कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर ते बारामतीला जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवार यांना विचारतात, अशी कडवट टीका भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली आहे. ते रत्नागिरीतील एका कार्यक्रमात बोलत होते. उद्धव ठाकरे यांना राज्याची काही माहिती नाही. त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शरद पवार आणि जयंत पाटील देतात. अशी स्थिती असल्यास मुख्यमंत्री महाराष्ट्राचा काय विकास करणार? असा खोचक सवालही राणे यांनी यावेळी केला आहे.

सध्या राज्याची निधी देण्याची क्षमता संपली आहे. त्यामुळे ते शहर विकासाला निधी उपलब्ध करून देऊ शकत नाही. तसेच याबाबत काही निर्णय घ्यायचा असेल तर मुख्यमंत्र्यांना अगोदर बारामतीला जावं लागेलं, असा टोलाही राणेंनी यावेळी लगावला आहे. (हेही वाचा - वर्षा बंगल्यावरुन राजकारण तापले; लिहिणाऱ्यांचे तोंड काळे झाल्याची संजय राऊतांची टीका)

शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर झाली. परंतु, त्याची रक्कम किंवा लाभार्थीही सरकार जाहीर करत नाही. फक्त घोषणाबाजी करून, फलक लावून जनतेची फसवणूक सुरू आहे, असंही राणे म्हणाले. तसेच ठाकरे यांनी भ्रष्टाचाराबद्दल काहीच बोलू नये. त्यांच्या भ्रष्टाचाराचा पाढा मी स्वत: वाचेन. मुंबईतील मेट्रोपासून मोठ्या कामांना स्थगिती देण्यामागेही भ्रष्टाचारच आहे, असा आरोपही राणे यांनी यावेळी केला.