वर्षा बंगल्यावरुन राजकारण तापले; लिहिणाऱ्यांचे तोंड काळे झाल्याची संजय राऊतांची टीका
Sanjay Raut | Photo Credits: Twitter/ ANI

वर्षा बंगल्यावरुन राजकारण तापले असताना शिवसेना (ShivSena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही यात उडी घेतली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकेर (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना वर्षा बंगला सोडावा लागला होता. यातच आता वर्षा बंगल्याच्या भिंतीवर नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबदल आक्षेपार्ह मजकूर आढळले आहे. 'मी हा मजकूर पाहिलेला नाही. मी कधी वर्षा बंगल्यावरही गेलो नाही. काही मजकूर असेल तर तो रंगरंगोटी करून मिटवता येईल. मात्र, ज्या लोकांनी असा मजकूर लिहिला आहे, त्यांचे तोंड मात्र आता काळे झाले आहे', असे संजय राऊत म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भाजप-शिवसेना युतीत मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांनावर्षा बंगला सोडावा लागला आहे. आता बंगल्याच्या भिंतीवर नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह मजकूर आढळल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. वर्षा बंगल्याच्या भिंतींवर देवेंद्र फडणवीस रॉक्स... यूटी इन मीन (यूटी वाईट आहेत), भाजप, भाजप असेही लिहिण्यात आले आहे. 'यूटी' म्हणजे नेमके कोण?; यावरून आता तर्कवितर्क लावले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या नावाचे इंग्रजीतील संक्षिप्त रूप 'यूटी' असे होते. त्यामुळे हे त्यांनाच उद्देशून असल्याची चर्चा सुरू आहे. हे देखील वाचा- वर्षा बंगल्यातील भिंतीवर लिहलेल्या वाक्यांवरुन देवेंद्र फडणवीस भडकले; पाहा काय म्हणाले?

दरम्यान, फडणवीस यांनी यात काहीही तथ्य नसल्याचे म्हटले आहे. 'साधारण 15 दिवसांपूर्वीच आम्ही बंगला सोडला. त्यावेळी कोपरा न् कोपरा पाहिला होता. तेव्हा असे काहीही लिहिलेले आढळले नव्हते. दिविजाने तर असे काही लिहिण्याचा प्रश्नच नाही. यावरून होणारे राजकारण अत्यंत दुर्दैवी आहे. आमची बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे,'असेही फडणवीस म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्यासह अमृता फडणवीस यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. सध्या सरु असलेल्या चर्चा एकून आश्चर्य वाटले. वर्षा बंगला सोडून जवळपास महिना उलटला आहे. बंगला सोडताना सर्व व्यवस्थित तपासले होते. आम्ही वर्षा बंगला सोडल्यानंतर पुन्हा एकदाही तेथे गेलेलो नाही, अशा अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.