शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकेर (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना वर्षा बंगला सोडावा लागला आहे. यातच आता वर्षा बंगल्याच्या भिंतीवर नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबदल आक्षेपार्ह मजकूर आढळले आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगला सोडला त्यावेळी भिंतीवर कोणत्याही प्रकारचे लिखाण नव्हते. अत्यंत गलिच्छ आणि खालच्या पातळीचे हे राजकारण आहे. तसेच आम्हाला बदनाम करण्याचे विरोधकांचे प्रयत्न सुरु आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

एबीपी माझा वृत्ताने दिलेल्या माहितीनुसार,  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंगला सोडल्यानंतर बंगल्याच्या भिंतीवर उद्धव ठाकरेंबद्दल लिहिलेला मजकूर सध्या व्हायरल होत आहे. नवीन मुख्यमंत्र्यांना रहाण्यासाठी तयार करण्यात येत होता. त्यावेळी वर्षा बंगल्यातील खोलीतील भींतीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिहले असल्याची माहीती आता समोर आली आहे. मात्र, फडणवीस यांनी यात काहीही तथ्य नसल्याचे म्हटले आहे. 'साधारण 15 दिवसांपूर्वीच आम्ही बंगला सोडला. त्यावेळी कोपरा न् कोपरा पाहिला होता. तेव्हा असे काहीही लिहिलेले आढळले नव्हते. दिविजाने तर असे काही लिहिण्याचा प्रश्नच नाही. यावरून होणारे राजकारण अत्यंत दुर्दैवी आहे. आमची बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे,' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. हे देखील वाचा- ठाकरे सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीवर राजू शेट्टी यांची नाराजी

ट्वीट-

या भिंतींवर देवेंद्र फडणवीस रॉक्स... यूटी इन मीन (यूटी वाईट आहेत), भाजप, भाजप असेही लिहिण्यात आले आहे. 'यूटी' म्हणजे नेमके कोण?; यावरून आता तर्कवितर्क लावले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या नावाचे इंग्रजीतील संक्षिप्त रूप 'यूटी' असे होते. त्यामुळे हे त्यांनाच उद्देशून असल्याची चर्चा सुरू झाली आहे.